Join us
Daily Top 2Weekly Top 5

संमिश्र वातावरणातही निर्देशांकाची आगेकूच

By admin | Updated: August 9, 2015 22:05 IST

दडपणाला न बधता भारतीय रिझर्व्ह बॅँकेने कायम राखलेले दर आणि व्याजदर कपातीला दिलेला नकार आणि आगामी कालावधीत कमी पाऊस होण्याचे हवामान विभागाचे भाकीत

प्रसाद गो. जोशीदडपणाला न बधता भारतीय रिझर्व्ह बॅँकेने कायम राखलेले दर आणि व्याजदर कपातीला दिलेला नकार आणि आगामी कालावधीत कमी पाऊस होण्याचे हवामान विभागाचे भाकीत या नकारात्मक घटनांसोबतच भविष्य निर्वाह निधी संघटनेने शेअर बाजारात गुंतवणुकीला प्रारंभ केल्याने बाजारात काहीसे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सप्ताह संमिश्र राहिला असला तरी निर्देशांकामधील वाढ कायम राहिली आहे. मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह संमिश्र राहिला असला तरी तेजीचाच जोर असल्याचे दिसून आले. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सप्ताहामध्ये १२२ अंशांनी वाढून २८२३६.३९ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ०.४ टक्कयांनी वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ८५३२.८५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये ३२ अंशांनी वाढ झालेली दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाढ झाली.कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची अनुमती मिळाली असून त्यांनी गतसप्ताहात बाजारामध्ये गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजाराला यामुळे अधिक ऊर्जितावस्था येणार आहे. भविष्य निर्वाह निधी संघटनचा पैसा बाजाराला उपलब्ध होणार असल्याने बाजार जोरात आला आहे. सप्ताहाच्या प्रारंभीच रिझर्व्ह बॅँकेने पतधोरणाचा आढावा जाहीर केला. बॅँकेवर व्याजदर कमी करण्याबाबत मोठे दडपण होते मात्र चलनवाढीचा दर अद्यापही जास्त असल्याने तूर्त तरी सर्व दर कायम राखणेच बॅँकेने श्रेयस्कर मानले आहे. या पतधोरणानंतर बाजारात काही प्रमाणात नैराश्य आले होते. दोन महिन्यांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याचाच अर्थ यामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी होणार आहे. विविध आस्थापनांचे जाहीर झालेले तिमाही निकालही बाजाराच्या अपेक्षेनुसार आलेले नाहीत. अपवाद होता तो लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचा. यामुळेही बाजारावर काही प्रमाणात विक्रीचा दबाव आला पण तो कायम राहिला नाही ही समाधानाची बाब.