नवी दिल्ली : मागण्यांवर विचार करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन करूनही दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्याच्या निर्णयाचा विरोध करण्यासाठी सराफांचा संप चालूच आहे. मंगळवारी या संपाने २१ दिवस पूर्ण केले.शनिवारी रात्री सराफांच्या एका गटाने संप मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यातून निर्माण झालेल्या संभ्रमाने मुंबईत सराफा बाजारात आणि देशात अनेक ठिकाणी सराफांनी त्यांची दुकाने उघडली होती. त्यांनी आज दुकाने बंद ठेवली. मात्र चेन्नईतील दुकाने उघडी राहिली. आॅल इंडिया सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरिंदरकुमार जैन म्हणाले की, सरकार जोपर्यंत अबकारी कर मागे घेत नाही, तोपर्यंत संप सुरू राहील. हा कर पूर्णपणे मागे घेण्याची आमची मागणी कायम आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २९ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना सोन्याच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून म्हणजे २ मार्चपासून सराफा व्यापारी बेमुदत संपावर गेले आहेत. मध्यप्रदेश सराफा असोसिएशनचे अध्यक्ष हुकूमचंद सोनी म्हणाले की, सरकार जोपर्यंत कराचा प्रस्ताव मागे घेणार नाही, तोपर्यंत आमचा संप चालूच राहील. या प्रकरणी सरकारने माजी मुख्य आर्थिक सल्लागार अशोक लाहिरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे.
सराफा व्यापाऱ्यांच्या संपाला २१ दिवस पूर्ण
By admin | Updated: March 23, 2016 03:38 IST