Join us  

खासगी दूरसंचार कंपन्यांच्या सेवेबाबत तक्रारी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 10:50 AM

ग्राहक मात्र खासगी कंपन्यांच्या सेवेबाबत समाधानी नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई : एमटीएनएल आणि बीएसएनएलचे ग्राहक वळते करण्यासाठी खासगी दूरसंचार कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू असताना, ग्राहक मात्र त्यांच्या सेवेबाबत समाधानी नसल्याचे समोर आले आहे. कोरोनाकाळात खासगी कंपन्यांच्या सेवेबाबत तक्रारी वाढल्या आहेत. भारती एअरटेलचा क्रमांक सर्वांत वरचा आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) शासनाला सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. २०२१ मध्ये ट्रायकडे तक्रारींची संख्या वाढली आहे. वर्षभरात एअरटेलच्या सेवेबाबत ट्रायला १६ हजार १११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्याखालोखाल व्होडाफोन-आयडिया १४ हजार ४८७ आणि जिओच्या ग्राहकांनी ७ हजार ३४१ तक्रारी दाखल केल्या आहेत.

व्होडाफोन-आयडियाबाबत दाखल १४ हजार ४८७ तक्रारींपैकी ९ हजार १८६ व्होडाफोनच्या, तर ५ हजार ३०१ तक्रारी आयडियाच्या सेवेसंदर्भातील आहेत. सरकारी दूरसंचार कंपन्या एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या सेवेबाबत सर्वांत कमी तक्रारी ट्रायकडे दाखल झाल्या आहेत. बीएसएनएलच्या २ हजार ९१३, तर एमटीएनएलच्या ७३२ वापरकर्त्यांनी सेवेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

तक्रारींचे निवारण कसे केले जाते?

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण कायदा १९९७ अन्वये ट्राय वैयक्तिकरीत्या कोणत्याही ग्राहकाशी संपर्क साधत नाही. प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती संबंधित कंपनीला दिली जाते. शिवाय त्यांचे तातडीने निवारण करण्याची सूचना केली जाते. ग्राहकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी द्विस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याचे निर्देश ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना दिले आहेत. त्याआधारे ग्राहक एकाचवेळी ट्राय आणि सेवाप्रदात्याकडे तक्रार नोंदवू शकतो. त्यानंतरही त्याचे समाधान न झाल्यास अपिलीय अधिकाऱ्याकडे दाद मागता येते.

टॅग्स :ट्रायएअरटेलरिलायन्स जिओव्होडाफोन