चौकशीची मागणीनाशिक : पेठ तालुक्यातील कोटंबी येथील सीमेंट क्रॉँकिटीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असून, त्याबाबत चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ पुंडलीक भुसारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोटंबी ग्रामपंचायतीअंतर्गत कोटंबी गावात सुरू असलेले सीमेंट क्रॉँकिटीकरणाचे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असून, रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूस चॅनल लावून मध्ये अडीच ते तीन इंच मोेठ्या खडीचा थर टाकून वरती एक ते दीड इंचाचा क्रॉँकिटीकरणाचा थर दिला जात असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. हे काम टिकाऊ नसून शासनाच्या निधीची फसवणूक आहे. याबाबत काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे संबंधित मक्तेदारास कळवूनही त्याकडे कोणी लक्ष देण्यास तयार नाही. याबाबत शाखा अभियंता शिंदे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी कोटंबी येथे भेट देऊन काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचे ठेकेदाराला सांगितले; मात्र त्यावर काहीही परिणाम झालेला नाही. याबाबत तत्काळ चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
कोटंबीला निकृष्ट कामाची तक्रार
By admin | Updated: September 23, 2014 00:16 IST