Join us

कोल इंडियाची आज हिस्सा विक्री

By admin | Updated: January 29, 2015 23:57 IST

कोल इंडिया लिमिटेडच्या शेअरची किंमत सरकारने ३५८ रुपये निश्चित केली आहे. ३० जानेवारी रोजी कोल इंडियातील १० टक्के मालकी सरकार विकणार

नवी दिल्ली : कोल इंडिया लिमिटेडच्या शेअरची किंमत सरकारने ३५८ रुपये निश्चित केली आहे. ३० जानेवारी रोजी कोल इंडियातील १० टक्के मालकी सरकार विकणार असून त्यातून २२,६०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. कोल इंडियाच्या एका शेअरची गुरुवारी व्यवहार बंद होतानाची किंमत ३७५.१५ रुपये होती. या किमतीच्या पाच टक्के कमी दराने या शेअरची फ्लोअर प्राईस किंवा किमान विक्री किंमत असेल. सरकार ३१.५८ कोटी शेअर्स (किंवा ५ टक्के मालकी) पब्लिक आॅफर माध्यमातून विकणार आहे. आणखी पाच टक्के शेअर्सची विक्री आॅफर फॉर सेल माध्यमातून केली जाईल. कोल इंडियाने २० टक्के शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवले आहेत. या शेअर्सवरही पाच टक्के सूट मिळेल.निर्गुंवणुकीतून सरकारने ४३,४२५ कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठरविले असून, कोल इंडियाच्या माध्यमातून हे लक्ष्य अर्ध्यापेक्षा जास्त गाठले जाईल. देशातील हा शेअर विक्रीचा सगळ्यात मोठा व्यवहार असेल.सरकारच्या निर्गंुतवणूक धोरणांतर्गत बाजारपेठेत उतरलेली कोल इंडिया ही दुसरी सरकारी कंपनी असेल. सध्या सरकारची कोल इंडियात ८९.६५ टक्के मालकी आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या (ओएनजीसी) मालकीतूनही सरकार काही प्रमाणात अंग काढून घेणार आहे; परंतु तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेतच घसरल्यामुळे यातील निर्गंुतवणूक सध्या अडचणीत आली आहे.हिंद मजदूर सभेशी संलग्न असलेल्या हिंद खदान मजदूर फेडरेशनचे अध्यक्ष नथूलाल पांडे म्हणाले की, सरकारच्या या निर्णयाला युनियनचा कडवा विरोध आहे. हे सगळेच असह्य असून असा काही निर्णय घेण्याआधी सरकारने आमच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यामुळेच आम्ही ‘नियमाप्रमाणे काम’ आंदोलन करणार आहोत, असे पांडे म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)