Join us

मैत्रेयची दोन्ही कार्यालये बंद गुंतवणूकदारांच्या चकरा : तांत्रिक कारणामुळे काम थांबल्याची सूचना

By admin | Updated: February 7, 2016 00:59 IST

जळगाव- शहरात मैत्रेयचे भरणा व वित्तीय बाबींशी संबंधित कार्यालय आणि खरेदी विक्री, मालमत्तांसंबंधीचे जिल्हा कार्यालय बंद करण्यात आले आहे.

जळगाव- शहरात मैत्रेयचे भरणा व वित्तीय बाबींशी संबंधित कार्यालय आणि खरेदी विक्री, मालमत्तांसंबंधीचे जिल्हा कार्यालय बंद करण्यात आले आहे.
मैत्रेय प्लॉट्स आणि स्ट्रक्चरच्या संचालक वर्षा सत्पाळकर यांना गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केल्यानंतर जिल्हाभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतने मैत्रेयच्या शहरातील कार्यालयांची स्थिती व इतर माहिती घेतली.

जिल्हा कार्यालय बंद
मैत्रेयचे प्लॉट्स आणि स्ट्रक्चर यासंबंधीचे जिल्हा कार्यालय शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील सी विंगमध्ये ३० व ३१ क्र.च्या गाळ्यांमध्ये आहे. ते शनिवारी बंद होते. कुठलीही सूचना त्या कार्यालयानजीक दिल्याचे दिसले नाही. या कार्यालयाच्या आजूबाजूला असलेल्या वाणिज्य आस्थापनांमधील कर्मचारी व संचालकांकडे जाऊन कानोसा घेतला असता शनिवारी हे कार्यालय बंद असते. पण ते काही दिवसांपासून बंद ठेवल्याचे सांगण्यात आले.

भरणा केंद्रही बंद
आरडी, एफडी खात्यांसंबंधीचे मैत्रेयचे भरणा केंद्र नवीन बीजे मार्केटच्या पूर्व भागातील गाळ्यांमध्ये दुसर्‍या मजल्यावर आहे. तेदेखील संगणकीय यंत्रणांच्या दुरुस्तीनिमित्त बंद केल्याची सूचना या कार्यालयाबाहेर लावली होती.

महिला गुंतवणूकदाराची एजंटवर नाराजी
बीजे मार्केटमधील कार्यालयाची माहिती घेत असतानाच एक गुंतवणूकदार महिला या कार्यालयानजीक आली. कार्यालय बंद असल्याचे लक्षात घेता या महिलेचा मोबाईलवर कुठल्याशा व्यक्तीशी संवाद सुरू होता. मी तुमच्या भरवशावर पैसे ठेवले आहेत... ते मिळाले नाहीत तर मी ते.. तुमच्याकडून घेईन... मला इतर काही माहिती नाही... असे ती महिला म्हणत होती. अर्थातच मैत्रेयच्या कार्यालयांकडे गुंतवणूदारांच्या चकरा सुरू झाल्याचे दिसून आले.

मैत्रेयचे जिल्हाभरात तीन लाख एजंट आहेत. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक त्यांच्या माध्यमातून मैत्रेयमध्ये झाली आहे. एफडी योजनेतून मैत्रेयतर्फे सहा वर्षांसाठी १९ हजार रुपये दिले जातात. तर आरडीसंबंधीदेखील वेगवेगळ्या योजना आहेत. अशा अनेक योजनांमध्ये गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले आहेत.