Join us

क्लिंटन इफेक्ट; सेन्सेक्स १८५ अंकांनी तेजाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 03:30 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ई-मेल प्रकरणातून एफबीआयने क्लिनचीट दिल्यामुळे शेअर बाजारातील चिंतेचे मळभ दूर झाले

मुंबई : अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांना ई-मेल प्रकरणातून एफबीआयने क्लिनचीट दिल्यामुळे शेअर बाजारातील चिंतेचे मळभ दूर झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे १८५ अंकांनी वाढला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही तेजाळला.ओबामा प्रशासनात विदेश मंत्री असताना हिलरी यांनी सरकारी ई-मेलसाठी खाजगी सर्व्हरचा वापर केल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात एफबीआयने अचानक हे प्रकरण फेरचौकशीसाठी घेतले होते. त्यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले होते. एफबीआयने या प्रकरणी हिलरी यांना क्लिनचीट दिल्यामुळे बाजारात चैतन्य परतले आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स १८४.८४ अंकांनी अथवा 0.६८ टक्क्यांनी वाढून २७,४५८.९९ अंकांवर बंद झाला. गेल्या पाच दिवसांत सेन्सेक्स ६६७.३६ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ६३.३0 अंकांनी अथवा 0.७५ टक्क्यांनी वाढून ८,४९७.0५ अंकांवर बंद झाला.