Join us

सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:37 IST

CIBIL Score : सिबील स्कोअर आता फक्त बँकेतून कर्ज घेण्यापुरता मर्यादीत राहिला नाही. तर सरकारी नोकरीतही सिबील स्कोअर तपासला जात असल्याचे एका प्रकरणातून समोर आलं आहे.

CIBIL Score : जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल, तर आता तुमच्या चारित्र्य प्रमाणपत्रासोबतच तुमच्या सिबील स्कोअरची (क्रेडिट स्कोअर) देखील काळजी घ्या. कारण, तुमचा सिबील स्कोअर चांगला नसेल, तर तुम्हाला नियुक्ती पत्र मिळाल्यानंतरही नोकरी गमवावी लागू शकते. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने एका उमेदवाराची नियुक्ती केवळ त्यांच्या खराब CIBIL स्कोअरमुळे रद्द केली आहे. या प्रकरणात जेव्हा पी. कार्तिकेयन यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली, तेव्हा न्यायालयाने एसबीआयचा निर्णय योग्य ठरवला आणि त्यांची याचिका फेटाळून लावली.

नियुक्ती पत्र मिळाल्यावरही नोकरी गेलीघडले असे की, एसबीआयने जुलै २०२० मध्ये चीफ बिझनेस ऑफिसर (CBO) या पदासाठी जाहिरात काढली होती. पी. कार्तिकेयन यांनी या पदासाठी अर्ज केला. त्यांनी सर्व परीक्षा पास केल्या आणि त्यांना १२ मार्च २०२१ रोजी नियुक्ती पत्रही मिळाले. पण, केवळ एका महिन्यात, ९ एप्रिल २०२१ रोजी, एसबीआयने त्यांची नियुक्ती रद्द केली. बँकेने याचे कारण दिले की, कार्तिकेयन यांच्या सिबील अहवालात 'आर्थिक शिस्तीत गंभीर त्रुटी' आढळल्या आहेत.

उमेदवाराची बाजू आणि न्यायालयाचा निर्णययावर कार्तिकेयन यांनी थेट मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यांनी दावा केला की, जाहिरात प्रसिद्ध झाली तेव्हा त्यांच्यावर कोणतेही कर्ज थकित नव्हते आणि त्यांनी सर्व कर्जे परत केली आहेत. त्यामुळे, एसबीआयचा निर्णय चुकीचा आहे. पण, बँकेने न्यायालयात सांगितले की, नोकरीच्या जाहिरातीमध्ये स्पष्टपणे नमूद केले होते की, ज्यांचा सिबील स्कोअर खराब असेल किंवा कर्जाचे पेमेंट थकलेले असेल, असे अर्जदार पात्र नसतील.

न्यायाधीश एन. माला यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर निर्णय दिला की, फक्त कर्ज फेडणे पुरेसे नाही, तर कर्ज परतफेडीचा इतिहास (रेकॉर्ड) देखील संपूर्ण कालावधीसाठी स्वच्छ असावा. न्यायाधीशांनी सांगितले की, एकदा उमेदवाराने नोकरीच्या अटी व शर्ती स्वीकारून अर्ज केला असेल, तर त्या अटींना नंतर आव्हान देता येत नाही. यामुळे बँकेचा निर्णय योग्य ठरला.

वाचा - गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?

या घटनेतून हे स्पष्ट होते की, आता कोणत्याही सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमचा सिबील स्कोअर व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, भविष्यात तुमचा खराब क्रेडिट रेकॉर्ड तुमच्या स्वप्नातील नोकरीच्या आड येऊ शकतो.

टॅग्स :बँकिंग क्षेत्रस्टेट बँक आॅफ इंडियाउच्च न्यायालयबँक