Join us

अमेरिकेला मागे टाकत चीन बनला सर्वात मोठी अर्थव्यवस्था

By admin | Updated: October 13, 2014 14:22 IST

जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणा-या अमेरिकेला मागे टाकत 'चीन' जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १३ - जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणा-या अमेरिकेला मागे टाकत 'चीन' जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) अहवालानुसार समकक्ष खरेदीक्षमतेच्या आधारे चीनचा जीडीपी १७.६ लाख कोटी डॉलर्स एवढा वाढला असून याच निकषावर अमेरिकेचा जीडीपी १७.४ लाख कोटी डॉलर्स आहे. चीनची लोकसंख्या अमेरिकेपेक्षा काही पटीने जास्त असल्यामुळे दरडोई उत्पन्नाचा विचार करता व एकूण श्रीमंतीचा विचार करता अमेरिका चीनपेक्षा फार पुढे असली तरी तांत्रिकदृष्ट्या जीडीपीच्या निकषावर मात्र चीनने अमेरिकेला मागे टाकले आहे. जर दरडोई जीडीपीचा विचार केला तर अद्याप चीनचा दरडोई जीडीपी अमेरिकेच्या तुलनेत एक चतुर्थांश आहे, मात्र अवाढव्य लोकसंख्येमुळे देशाचा जीडीपी समकक्ष खरेदी क्षमतेच्या किंवा परचेस पॉवर पॅरिटीच्या निकषाच्या आधारे अमेरिकेच्या जीडीपीच्या पुढे गेला आहे. गेली १४५ वर्षे जीडीपीच्या आधारे पहिल्या क्रमांकावर असलेली अमेरिका यामुळे दुस-या स्थानावर घसरली आहे. चीनची अर्थव्यवस्था तीन दशके दहा टक्क्यांपेक्षा जास्त गतीने वाढल्यामुळे चीनला हे वैभव प्राप्त झाले असून जागतिक मंदीच्या वातावरणात घसरलेली चीनची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. आयएमएफच्या अंदाजानुसार या वर्षी चीनची अर्थव्यवस्था ७.४ टक्क्यांच्या गतीने तर पुढच्या वर्षी ७.१ टक्क्यांच्या गतीने वाढणार आहे