Join us

१४ वर्षांखालील मुलंही करु शकतील काम ?

By admin | Updated: April 27, 2015 15:26 IST

कामगार कायद्यात बदल करण्याच्या प्रयत्नांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या मोदी सरकारने आता बालकामगारविरोधी कायद्यातही सुधारणा करण्याचा घाट घातला आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २७ - कामगार कायद्यात बदल करण्याच्या प्रयत्नांमुळे टीकेचे धनी ठरलेल्या मोदी सरकारने आता बालकामगारविरोधी कायद्यातही सुधारणा करण्याचा घाट घातला आहे. मोदी सरकारच्या प्रस्तावित कायद्यानुसार १४ वर्षांखालील मुलंही त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात हातभार लावू शकतील पण त्यासाठी मुलांच्या शिक्षणात बाधा येणार नाही ही अट बंधनकारक केली जाणार आहे. 
केंद्र सरकार आगामी काळात बालकामगारविरोधी कायद्यात काही सुधारणा करणार आहे. यात कोणत्याही लहान किंवा मोठ्या संस्थेत लहान मुलांच्या काम करण्यावर बंदी कायम राहणार आहे. पण कुटुंबाच्या व्यवसायात १४ वर्षांखालील हातभार लावता येणार आहे. यात त्या मुलाच्या शिक्षणात बाधा येणार नाही याची दक्षता संबंधीत कुटुंबाला घ्यावी लागणार आहे. शेती, वन, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रासोबतच घरी बसून काम करणा-या कुटुंबांना हा नियम लागू होऊ शकतो. सर्कसला यातून वगळण्यात आले आहे. १४ ते १८ या वयोगटातील मुलांना घातक उद्योगधंद्यांमध्ये (उदा. केमिकल फॅक्टरी) काम करता येणार नाही. 
२०१२ मध्ये राज्यसभेत मांडलेल्या सुधारित बालकामगारविरोधी विधेयकात लहान मुलांच्या काम करण्यावर सरसकट बंदी घालण्यात आली होती. शिक्षणाचा हक्क या कायद्यानुसार प्राथमिक शिक्षण घेतल्याखेरीज मुलांना काम करता येणार नाही असे या विधेयकात म्हटले आहे. मोदी सरकारचे विधेयकही लवकरच संसदेत मांडले जाईल असे समजते.