Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील गाड्यांचीही तपासणी

By admin | Updated: September 25, 2015 22:17 IST

वाहनातून होणाऱ्या कार्बन व नायट्रोजन आॅक्साईड अशा घातक वायूंच्या उत्सर्जनाची खरी माहिती दडवून सॉफ्टवेअरच्या आधारे ती बनावट पद्धतीने सादर करणाऱ्या

मुंबई : वाहनातून होणाऱ्या कार्बन व नायट्रोजन आॅक्साईड अशा घातक वायूंच्या उत्सर्जनाची खरी माहिती दडवून सॉफ्टवेअरच्या आधारे ती बनावट पद्धतीने सादर करणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीच्या भारतातील वाहनांची सखोल तपासणी करत या संदर्भातील अहवाल येत्या ३० सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिलेआहेत.केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने ‘आॅटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन आॅफ इंडिया’ (एआरएआय) या संस्थेला तपासणी करण्याची सूचना देतानाच या संदर्भातील सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर बोलताना केंद्रीय अवजड-उद्योगमंत्री अनंत गिते म्हणाले की, आपल्या देशातील उत्सर्जनाचे निकष-प्रमाण वेगळे आहेत. मात्र, तरीदेखील फोक्सवॅगन कंपनीने देशातील नियमांचे उल्लंघन केले आहे का, याची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपनीने भारतातही जर चूक केली असल्याचे आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाईचेही संकेत गिते यांनी दिले आहेत. फोक्सवॅगन कंपनीने केलेल्या घोटाळ्याची माहिती उघड झाल्यानंतर अमेरिकेने कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला.यानंतर कंपनीने तातडीने अमेरिकेतील पाच लाख वाहने माघारी बोलावली; परंतु ज्या वाहनांमध्ये हा गैरप्रकार केला आहे, ते इंजिन ‘ईए-१८९’ या बनावटीचे असून केवळ अमेरिकाच नव्हे तर भारतासह अनेक देशांतून या इंजिनचा समावेश असलेल्या कंपनीच्या गाड्या आहेत. प्राथमिक अंदाजानुसार कंपनीच्या अशा वाहनांची संख्या ही एक कोटी १० लाख इतकी आहे.या सर्व गाड्या डिझेल इंजिनच्या आहेत. ‘ईए-१८९’ ही इंजिन प्रामुख्याने फोक्सवॅगन-गोल्फ, फोक्सवॅगन पसाट, फोक्सवॅगन जेट्टा, फोक्सवॅगन बीटल या चार मॉडेल्समध्ये आहे. २००९ ते २०१५ अशा कालावधीत यांची निर्मिती झाली आहे.ही सर्व मॉडेल्स भारतामध्ये देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील ग्राहकांची फसवणूक करतानाच प्रदूषणाची मात्रा वाढविण्यात कंपनीचा हातभार लागल्याचा कयास आहे. (प्रतिनिधी)