Join us

चेकचे एसएमएस अलर्ट आता सक्तीचे

By admin | Updated: November 8, 2014 01:46 IST

खातेदाराने त्याच्या खात्यात चेक जमा केल्यावर चेक देणारा आणि घेणारा अशा दोघांनाही त्यांच्या बँकांनी तशी सूचना मोबाईलवर ‘एसएमएस’ पाठवून द्यावी

मुंबई : खातेदाराने त्याच्या खात्यात चेक जमा केल्यावर चेक देणारा आणि घेणारा अशा दोघांनाही त्यांच्या बँकांनी तशी सूचना मोबाईलवर ‘एसएमएस’ पाठवून द्यावी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना जारी केले आहेत.आतापर्यंत डेबिट किंवा क्रेडिट कार्डावर केल्या जाणाऱ्या व्यवहारांचे असे ‘एसएमएस अलर्ट’ ग्राहकांना पाठविणे बँकांना बंधनकारक होते. मात्र आता चेकसाठीही अशी व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे भविष्यात तुम्ही जेव्हा खात्यात जमा केलेला चेक ‘क्लीअरिंग’साठी जाईल तेव्हा तुमच्या बँकेस तुम्हाला एसएमएस पाठवून तशी सूचना तुम्हाला द्यावी लागेल. तसेच ज्याने तुम्हाला चेक दिला असेल त्या व्यक्तीसही त्याच्या बँकेकडून, ‘तुम्ही दिलेले अमूक अमूक चेक ऋणकोने क्लीअरिंगसाठी जमा केला आहे’, असा एसएमएस पाठविला जाईल.एवढेच नव्हे, तर संशयास्पद वाटणाऱ्या व मोठ्या रकमेच्या चेकचे क्लीअरिंग करण्यापूर्वी बँकेने संबंधित खातेदारास फोन करून त्याने खरोखरच तो चेक दिला आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी, असेही रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.या संदर्भात बँकांना पाठविलेल्या एका परिपत्रकात रिझर्व्ह बँक म्हणते की, चेकच्या संदर्भात होणाऱ्या घोटाळ्यांच्या संख्येत वाढ होत आहे, ही गंभीर चिंतेची बाब आहे. चेकचे क्लीअरिंगसाठी प्रोसेसिंग करताना योग्य ती काळजी घेतली गेली आणि नव्याने उघडलेल्या खात्यांमध्ये होणाऱ्या व्यवहारांवर अधिक सावधपणे लक्ष ठेवले तर असे घोटाळे टाळता येण्यासारखे आहेत.निव्वळ यंत्रवत पद्धतीने चेक क्लीअरिंगचे काम केले जाऊ नये आणि त्या कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यासाठी नेमले जाणारे कर्मचारी योग्य असतील याकडे बँकांनी विशेष लक्ष द्यावे, असेही रिझर्व्ह बँकेने त्यांना सांगितले आहे.दोन लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या सर्व चेकचे, त्यात काही गडबड नाही ना याची खात्री करण्यासाठी, अल्ट्राव्हायोलेट दिव्याखाली धरून स्कॅनिंग केले जाईल आणि पाच लाख रुपयांहून अधिक रकमेच्या चेकची क्लीअरिंगला पाठविण्यापूर्वी अनेक पातळ्यांवर छाननी होईल, याचीही बँकांनी खात्री करावी, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. (विशेष प्रतिनिधी)