Join us  

तुमच्याकडून विनाकारण तर GST आकारला जात नाहीये ना? जाणून घ्या हा फंडा, बिलात द्यावे लागतील कमी पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 12:41 PM

सरकारच्या एका स्कीम अंतर्गत येणाऱ्या व्यापाऱ्यांना जीएसटी भरावा लागत नाही. पण काही वेळा त्या बिलांमध्ये तो आपल्याकडून मात्र वसूल केला जात असतो.

वस्तू आणि सेवा कर (GST) १ जुलै २०१७ पासून देशात लागू करण्यात आला. वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर जीएसटीचे दर वेगवेगळे असतात. सुपरमार्केटच्या बिलांपासून ते मल्टिप्लेक्सच्या तिकीटांपर्यंत आणि रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्समधील खाद्यपदार्थांच्या बिलांपर्यंत सर्व गोष्टींवर आपल्याला जीएसटी भरावा लागतो. हा कर आपण थेट सरकारला भरत नाही तर व्यापाऱ्यांमार्फत सरकारला दिला जातो. पण, अनेक ठिकाणी आपल्याला जीएसटी भरावा लागत नाही. परंतु, माहितीअभावी आपण तो भरतो. यामध्ये अनेक रेस्टॉरंट्सचाही समावेश आहे. जी रेस्टॉरंट्स सरकारच्या जीएसटी कंपोझिशन स्कीमचा लाभ घेत आहेत, ते रेस्टॉरंटमध्ये तयार केलेल्या खाद्यपदार्थाच्या बिलावर ग्राहकांकडून जीएसटी आकारू शकत नाहीत. 

छोट्या व्यापाऱ्यांवरील कराचा बोजा कमी करण्यासाठी कंपोझिशन स्कीमचा लाभ दिला जातो. कंपोझिशन स्कीमचा अवलंब करणारे व्यावसायिक टॅक्सची रिसिट देऊ शकत नाहीत. कारण, त्यांना त्यांच्या ग्राहकांकडून कर वसूल करण्याचा अधिकार नाही. त्याऐवजी कंपोझिशन व्यापाऱ्यांना स्वत:च्या खिशातून कर भरावा लागतो. 

काय आहे जीएसटी कम्पोझिशन स्कीम? 

ज्या व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल १.५० कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही आणि जे इतर राज्यांमध्ये व्यवसाय करत नाहीत ते जीएसटी कंपोझिशन स्कीमचा लाभ घेऊ शकतात. कंपोझिशन स्कीममध्ये नोंदणी केल्यानंतर, दरमहा रिटर्न भरण्याची किंवा सर्व डीलच्या पावत्या सादर करण्याची गरज नाही. वस्तूंच्या व्यापारावर फक्त १ टक्के कर भरावा लागतो. सेवा व्यवसायावर ६ टक्के आणि मद्याची विक्री केली जात नसलेल्या रेस्टॉरंट व्यवसायावर ५ टक्के कर भरावा लागेल. 

जीएसटी द्यायचा का नाही बिलावरून समजणार 

तुम्ही ज्या ठिकाणी जेवता त्या रेस्टॉरंटचे बिल काळजीपूर्वक पहा. जीएसटी कंपोझिशन स्कीमचा लाभ घेणाऱ्याला त्यांच्या बिलावर "omposition taxable person, not eligible to collect tax on supplies" असं लिहिणं अनिवार्य आहे. जर ही गोष्ट बिलावर लिहिलेली असेल तर तो तुमच्या बिलात जीएसटी चार्ज जोडू शकत नाही. तुम्ही त्या बिलावर अतिरिक्त जीएसटी शुल्क भरण्यास नकार देऊ शकता. 

तुम्ही जीएसटी पोर्टलद्वारे याची माहिती घेऊ शकता. तुम्ही ज्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेला आहात, त्यांनी या स्कीमचा लाभ घेतलाय का नाही हे याद्वारे कळू शकतं. ऑनलाइन माहित करून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. 

  • सर्वप्रथम जीएसटीचं पोर्टल  https://www.gst.gov.in/ यावर जा.
  • त्यानंतर Search Taxpayer वर क्लिक करा.
  • तुमच्या बिलावर असलेला जीएसटी क्रमांक एन्टर करा.
  • यावरुन तुम्हाला ते रेस्टॉरंट रेग्युलर जीएसटी पेयर आहे की कंपोझिट जीएसटी पेयर आहे हे समजेल.
  • जर तो कंपोझिट पेयर असेल तर बिलावर आकारण्यात आलेला जीएसटी भरू नका.
  • जर यानंतर जबरदस्ती जीएसटी भरण्यास सांगण्यात आलं तर तुम्ही याची ऑनलाइन https://gstcouncil.gov.in/grievance-redressal-committee-grc यावर जाऊन तक्रार करू शकता.
टॅग्स :जीएसटीसरकार