पोलिसांच्या मदतीने महामार्ग केला चकाचक नागापूर पुलावरील प्रकार: सनफार्मा कंपनीचा पुढाकार
By admin | Updated: December 12, 2014 23:49 IST
अहमदनगर: येथील नागापूर पुलावरील रासायनिक पावडर उचलून शुक्रवारी रस्ता चकाचक करण्यात आला़ सनफार्मा कंपनीच्या कर्मचार्यांनी हाती झाडू घेऊन महामार्गावर स्वच्छता अभियान राबविले़ पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या सहकार्याने रस्ता पाण्याने स्वच्छ करण्यात आला असून, पावडर नष्ट करण्यासाठी रांजणगावला पाठविण्यात आली़ सनफार्माच्या पुढाकाराने संयुक्तरित्या राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे प्रवाशांकडून कौतुक करण्यात आले़
पोलिसांच्या मदतीने महामार्ग केला चकाचक नागापूर पुलावरील प्रकार: सनफार्मा कंपनीचा पुढाकार
अहमदनगर: येथील नागापूर पुलावरील रासायनिक पावडर उचलून शुक्रवारी रस्ता चकाचक करण्यात आला़ सनफार्मा कंपनीच्या कर्मचार्यांनी हाती झाडू घेऊन महामार्गावर स्वच्छता अभियान राबविले़ पोलीस प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्या सहकार्याने रस्ता पाण्याने स्वच्छ करण्यात आला असून, पावडर नष्ट करण्यासाठी रांजणगावला पाठविण्यात आली़ सनफार्माच्या पुढाकाराने संयुक्तरित्या राबविण्यात आलेल्या या मोहिमेचे प्रवाशांकडून कौतुक करण्यात आले़ मनमाड महामार्गवरील नागापूर पुलावर रासायनिक पावडर घेऊन जाणार्या ट्रकला अपघात होऊन ट्रक उलटला़त्यामुळे ट्रकमधील पांढर्या रंगाची रासायनिक पावडर रस्त्यावर सांडली़ दुभाजकावरही पावडरचा ढीग साचला़ बॅगही रस्त्यात अस्ताव्यस्त पडल्या होत्या़ ही घटना होऊन दहा दिवस उलटले़ मात्र पावडर उचलणे तर दूरचे झाले, पण ही पावडर कशाची आहे, ती शरिरास घातक आहे का, याची चौकशी करण्याची तसदीदेखील कोणत्याही विभागाने घेतली नाही़ या पावडरमुळे वाहन चालविणे कठीण झाले होते़ या पार्श्वभूमीवर नागापूर येथील औद्योगिक वसाहतीतील सनफार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाने ही पावडर जमा करून नष्ट करण्याचा निर्णय घेतला आणि कर्मचार्यांचे एक पथक पावडर उचलण्यासाठी शुक्रवारी सकाळी नागापूर पुलावर दाखल झाले़ कंपनीचे कार्मिक व्यवस्थापक कैलास गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी सकाळी ११ वाजता पोलिसांच्या मदतीने महामार्गावरील पावडर जमा करून बॅगमध्ये भरण्याची मोहीम सुरू केली़ कंपनीच्या वतीने कर्मचार्यांना हातमोजे, मास्क आणि हेल्मेट देण्यात आले़ दिवसभरात कर्मचार्यांनी १५० बॅग पावडर जमा केली़ या पावडरची चाचणी होणे आवश्यक असल्याने याविषयी ही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख प्रमोद माने यांच्याशी संपर्क साधला़त्यांनी पावडर नष्ट करण्याची तयारी दर्शविली़ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माने यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी रासायनिक पावडर नष्ट करण्यासाठी यंत्रणेचा शोध घेतला असता रांजणगाव येथे पावडर नष्ट करण्याचे प्रकल्प असल्याचे त्यांना सांगण्यात आले़ तसेच तेथील अधिकार्यांनी पावडर घेऊन जाण्यासाठी वाहन पाठविण्याची तयारी दर्शविली़ तेथून त्यांनी ट्रक पाठविला़ त्यात ही पावडर नष्ट करण्यासाठी पाठविण्यात आली़ त्यानंतर महापालिकेच्या अग्निशमनच्या अधिकार्यांशीही संपर्क साधून त्यांनाही पाचारण करण्यात आले़ या कर्मचार्यांनी रस्ता पाण्याने स्वच्छ केला़ महापालिका, पोलीस आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने महामार्गावरील रासायनिक पावडर उचलून रस्ता सायंकाळी स्वच्छ करण्यात आल्याचे गुरव यांनी सांगितले़