Join us  

सणासुदीसाठी उडीद, डाळींची करणार आयात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 9:00 AM

महागाईच्या नियंत्रणासाठी केंद्र सरकारचे उपाय

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशामधील कडधान्यांसह डाळींच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होत आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महागाईला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकार म्यानमारकडून अडीच लाख टन उडीद  तसेच डाळींची आयात करून देशांतर्गत दर कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. 

भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये या आयातीबाबत करार झाला असून त्याबद्दलच्या प्रक्रियेवरही चर्चा करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देताना परदेश व्यापार महासंचालनालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, केवळ पाचच बंदरांमध्ये या मालाची आयात केली जाणार आहे. मुंबई, तुतिकोरिन, चेन्नई, कोलकाता आणि हजिरा या बंदरांमध्ये ही आयात केली जाणार आहे. केंद्र सरकार म्यानमारकडून अडीच लाख टन उडिदाची आयात करण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय १ लाख टन तुरीच्या डाळीचीही आयात केली जाणार आहे.

यापूर्वीही सरकारने  मोझांबिक तसेच ब्राझीलकडून डाळींची आयात करून देशातील डाळींची तूट भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सरकारच्या या प्रयत्नांना अद्याप तरी यश आलेले नाही. नुकतीच सरकारने खाद्यतेलांच्या वाढत्या किमती कमी होण्यासाठी त्यावरील आयात शुल्क कमी केले आहे. 

टॅग्स :महागाईकेंद्र सरकार