Join us

देशात आणखी ५५ हजार बनावट कंपन्या, राज्यांच्या मुख्य सचिवांना केंद्राचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 04:56 IST

देशभरात आणखी ५५ हजार बनावट कंपन्या असल्याचे समोर आले आहे. त्या कंपन्यांच्या संचालकांची संपत्ती गोठविण्याचे आदेश संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले

मुंबई : देशभरात आणखी ५५ हजार बनावट कंपन्या असल्याचे समोर आले आहे. त्या कंपन्यांच्या संचालकांची संपत्ती गोठविण्याचे आदेश संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांना दिले आहेत, अशी माहिती कंपनी व्यवहार राज्यमंत्री पी.पी. चौधरी यांनी ‘लोकमत’ला दिली. इंडो-अमेरिकन चेंबर आॅफ कॉमर्सच्या वार्षिक परिषदेनंतर ते बोलत होते.ते म्हणाले, नोटाबंदीदरम्यान दोन कंपन्यांनी ३,७०२ कोटी व २,२८१ कोटी रुपयांची रोख बँकेत भरली होती. त्यावरून बनावट कंपन्यांचा शोध सुरू झाला. पहिल्या टप्प्यात अशा २.२६ लाख कंपन्या आढळल्या. या कंपन्या दहशतवादी कारवाया व अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मनी लॉड्रिंग करीत होत्या. यासंबंधीचा तपास आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या कंपन्यांच्या संचालकांवर कठोर कारवाई केली जाईल.जेट एअरवेजच्या ताळेबंदात घोटाळा असल्याचे सकृतदर्शनी आढळले आहे. त्यामुळेच त्यांच्या वहीखात्यांचा तपास सुरू आहे,असेही चौधरी यांनी सांगितले.जेटने ५ हजार कोटी रुपयांचानफा लपविल्याची चर्चा आहे.पण तो विषय ‘सेबी’चा असल्याचे सांगत त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.>पायाभूत सुविधांमध्ये अमेरिकेची गुंतवणूकदेशातील पायाभूत सुविधा क्षेत्रात अमेरिकन कंपन्या गुंतवणूक करण्यास तयार आहेत. पण भारतीय बँकांकडून वित्त साहाय्य घेण्यात अडचणी असल्याचे मत परिषदेत व्यक्त करण्यात आले. अमेरिकेचे भारतातील दूत केनेथ जस्टर, आयएसीसीचे माजी अध्यक्ष नानी रुपानी, पश्चिम क्षेत्र प्रमुख मधुलिका गुप्ता आदी या वेळी उपस्थित होते.>चीनसोबत संतुलित व्यापार करणार - प्रभूचिनी वस्तूंची भारतातील आयात सातत्याने वाढत असताना त्या तुलनेत निर्यात खूप कमी आहे. यासाठी चीनशी संतुलित व्यापार करण्याचे धोरण आखले जात आहे. प्रामुख्याने भारतीय तांदूळ व येथे उत्पादित होणाऱ्या औषधांची चीनला निर्यात करण्यासंबंधी अभ्यास सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. भारतात देशनिहाय विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) उभे करण्याबाबत जपान, कोरिया व रशियातील कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. या कंपन्या येथे कारखाना सुरू करतील व जगभरात वस्तूंची निर्यात करतील, असे प्रभू यांंनी सांगितले.