Join us

सीसीआय-पणनची कापूस खरेदी १०४ लाख क्विंटल

By admin | Updated: March 9, 2015 23:58 IST

सीसीआय आणि पणन महासंघाने आतापर्यंत राज्यात एक कोटी चार लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून आणखी २५ ते ३० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याचा अंदाज आहे.

यवतमाळ : सीसीआय आणि पणन महासंघाने आतापर्यंत राज्यात एक कोटी चार लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून आणखी २५ ते ३० टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून असल्याचा अंदाज आहे.कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाचे (सीसीआय) अकोला युनिटअंतर्गत विदर्भात १७ तर औरंगाबाद युनिटअंतर्गत खानदेश-मराठवाड्यात ३५ कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. नाफेडचा एजंट असलेल्या कापूस उत्पादक पणन महासंघाने राज्यात १२६ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू केली होती. अधिकृतरित्या यातील कोणतेही केंद्र बंद झालेले नाही. मात्र अवकाळी पाऊस व आवक कमी झाल्याने काही केंद्रांवरील खरेदी तूर्त बंद करण्यात आली आहे. सीसीआयने आतापर्यंत राज्यात ७६ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली. त्यातील एकट्या औरंगाबाद युनिटअंतर्गत ४८ लाख क्विंटल कापसाचा समावेश आहे. पणन महासंघाने राज्यात २६ लाख ५० हजार क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. गतवर्षी बाजारात कापसाला चांगला भाव असल्याने पणनला कापूस मिळाला नव्हता. यावर्षी मात्र पणनने मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केली आहे. यावर्षी आतापर्यंत हमीभावापेक्षा कमी दर बाजारात असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय एजन्सीलाच कापूस देणे पसंत केले. त्यातही पणनला कापूस दिल्यास चुकाऱ्यातून पीक कर्जाची वसुली होण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांचा अधिक कल सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे होता. एक कोटी चार लाख क्विंटल कापसाची खरेदी राज्यभरात झाली असली तरी आणखी २५ ते ३० टक्के कापूस येण्याची प्रतीक्षा आहे. सधन कास्तकारांनी चांगल्या भावाच्या प्रतीक्षेत हा कापूस अद्याप विक्रीसाठी काढलेला नाही.