Join us

कारविक्रीचा टॉप गीअर

By admin | Updated: September 11, 2014 02:39 IST

वाहन उद्योगाच्या बाजारात सुधारणा होत असून कारविक्रीही वाढत आहे.

नवी दिल्ली : वाहन उद्योगाच्या बाजारात सुधारणा होत असून कारविक्रीही वाढत आहे. या वर्षी आॅगस्ट महिन्यात कारविक्रीत १५.१६ टक्क्यांनी वाढ होऊन १,५३,७५८ कार विकल्या गेल्या. सलग चार महिन्यांपासून कार विक्रीचा गीअर टॉपमध्ये आहे.गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये भारतीय बाजारात १,३३,५१३ कार विकल्या गेल्या होत्या. दोन वर्षाच्या मंदीनंतर आता वाहन क्षेत्रात सुधारण होण्याची आशा आहे.सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्सच्या (सियाम) आकडेवारीनुसार आॅगस्ट महिन्यात १४.४५ टक्के वाढ होत ९,१०,३१२ मोटारसायकली विकल्या गेल्या. मागच्या वर्षी याच महिन्यात ७,९५,४११ मोटारसायकली विकल्या गेल्या होत्या.आॅगस्ट २०१४ मध्ये मारुती सुझुकी इंडियाच्या विक्रीत ३०.४३ टक्के वाढ झाली. या महिन्यात या कंपनीच्या ८२,८२३ कार विकल्या गेल्या. ह्युंदाई मोटारच्या विक्रीत १८.७८ टक्के वाढ होऊन ३३,५९३ कार विकल्या गेल्या. तसेच होंडा कार्सच्या विक्रीत २७.३९ टक्के वाढ होऊन या कंपनीच्या ११,१६६ कार विकल्या गेल्या.तथापि, टाटा मोटर्सच्या विक्रीत ६.०७ टक्के घट झाली. आॅगस्टमध्ये टाटा मोटर्सच्या ८,२२९ कार विकल्या गेल्या. महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीतही घट होऊन या कंपनीच्या १३,९११ कार विकल्या गेल्या.