Join us
Daily Top 2Weekly Top 5

कार पुरात बुडाली; आर्थिक भरपाई कशी मिळवाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2024 12:19 IST

आपले नुकसान टाळण्यासाठी नेमके काय करावे हे जाणून घेऊ...

चंद्रकांत दडस, उपसंपादक, सध्या देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून, यात अनेक वाहने पुरात बुडून मोठे नुकसान होत आहे. नुकतेच पुण्यात आलेल्या पुरानेही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला. अशावेळी आपले नुकसान टाळण्यासाठी नेमके काय करावे हे जाणून घेऊ...

कार पाण्यात बुडाली तर पैसे मिळतात का?

कार पाण्यात बुडाली तर पैसे नक्की मिळतात. मात्र, त्यासाठी तुमच्याकडे विमा असणे आवश्यक आहे. तुमची विमा कंपनी तुम्हाला पुरात बुडालेल्या कारसाठी पैसे देईल. मात्र, ही रक्कम तुमच्या कारच्या सध्याच्या आयडीव्ही मूल्याइतकी असेल. जर दुरुस्तीचा खर्च आयडीव्ही मूल्यापेक्षा कमी असेल तर कंपनी तुमची कार दुरुस्त करून देईल. तुमची कार चांगल्या स्थितीत नसताना कंपनी तुम्हाला जी रक्कम देते त्याला आयडीव्ही मूल्य असते. तुमच्या माहितीसाठी की, वाहनाचे आयडीव्ही मूल्य दरवर्षी १० टक्क्यांनी कमी होते.

नेमके काय करावे?

ताबडतोब विमा देणाऱ्याला अन् कार कंपनीला माहिती द्या. कार बुडाल्यास किंवा वाहून गेल्यास, तिच्या नुकसानीचे पुरावे जमा करा. जसे की व्हिडीओ काढणे किंवा फोटो घेणे. कारचे नोंदणी प्रमाणपत्र, पॉलिसी कागदपत्रे तसेच इतर कागदपत्रे जमा करून ठेवावीत.

नेमके काय होते नुकसान?

- इंजीन डॅमेज - गीअरबॉक्स डॅमेज - इलेक्ट्रिक डॅमेज - कारमधील ॲक्सेसरीज - इंटरनल डॅमेज

बुडालेली गाडी सापडल्यावर काय?

- जर तुमची कार पुरात बुडालेली आढळली तर तुमच्या खिशातील पैसे जाऊ शकतात. जर तुम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स घेतला असेल पण इंजीन कव्हरसाठी ॲड-ऑन प्लॅन घेतला नसेल, तर या प्रकरणात कंपनी इंजीन दुरुस्त करण्यासाठी पैसे देणार नाही आणि तुम्हाला तुमच्या स्वतःच्या खिशातून इंजीन दुरुस्तीसाठी खर्च करावा लागेल. 

- लक्षात ठेवा की थर्ड पार्टी कार विमा पॉलिसी पूर किंवा पाण्यात कार बुडाल्यानंतर डॅमेज कव्हर देत नाही. जर तुम्ही ॲड-ऑन प्लॅन घेतला नाही, तर इंजीन दुरुस्त करण्यासाठी किमान १ लाख खर्च येऊ शकतो.

 

टॅग्स :कार