Join us

क्रेडिट कार्डवर होऊ शकेल कार खरेदी

By admin | Updated: October 15, 2014 03:16 IST

देशातील कारच्या विक्रीला चालना मिळावी यासाठी विक्रेते प्रयत्नशील असून, आगामी सणासुदीच्या कालावधीत अधिकाधिक विक्री व्हावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत

नवी दिल्ली : देशातील कारच्या विक्रीला चालना मिळावी यासाठी विक्रेते प्रयत्नशील असून, आगामी सणासुदीच्या कालावधीत अधिकाधिक विक्री व्हावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून नवीन कारच्या खरेदीवरील मार्जिनची रक्कम क्रेडिट कार्डद्वारे देण्याची मुभा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. गेली तीन वर्षे देशातील वाहन उद्योगाला मंदीचा सामना करावा लागत आहे. वाहन विक्रीला चालना मिळावी यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून कार खरेदीसाठी लागणारी मार्जिनची रक्कम क्रेडिट कार्डद्वारे देण्याची योजना आखण्यात आली असून, ती काही बॅँकांना सादरही करण्यात आली आहे. कोणत्याही कारच्या खरेदीत कर्जाची रक्कम वजा जाता सुमारे २० टक्के रक्कम भरावी लागते. ग्राहक शोरूम बाहेर पडल्यानंतर त्याचे मतपरिवर्तन होऊ नये यासाठी विके्रत्यांनी या योजनेचा आग्रह धरला आहे. वाहनांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा अभ्यास करता सुमारे आठ टक्के व्यवहार हे क्रेडिट कार्डाद्वारे होत असतात. मात्र असे व्यवहार करताना जोखीम वाढत असल्याचे मत बॅँकिंग क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. बॅँकिंगमधील काही तज्ज्ञांच्या मते भारतीय ग्राहक विमान तिकिटे, तसेच अन्य गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी जसे क्रेडिट कार्ड वापरतात, तसेच ते कारच्या खरेदीसाठीही वापरतांना दिसतात. चीनमध्ये मात्र अजूनही केवळ सधन व्यक्तीच क्रेडिट कार्डचा वापर करताना दिसून येतात. असे असले तरी काही भारतीय विक्रेते मात्र कार्डपेक्षा चेकद्वारे रक्कम स्वीकारणेच योग्य मानतात. कारण कार्डाद्वारे रक्कम दिल्यावरही जर तो व्यवहार रद्द झाला, तर रक्कम वसूल कशी करायची हा प्रश्न उरत असल्याने हे विक्रेते साशंक असतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)