Join us

रिलायन्स इन्शुरन्सला ग्राहक मंचचा दणका

By admin | Updated: September 8, 2014 03:03 IST

उच्च रक्तदाब असल्याची माहिती लपविल्याचे कारण पुढे करीत ग्राहकाच्या औषधोपचार खर्चाचा प्रतिपूर्ती दावा नाकारणा-या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला ठाणे जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला

ठाणे : उच्च रक्तदाब असल्याची माहिती लपविल्याचे कारण पुढे करीत ग्राहकाच्या औषधोपचार खर्चाचा प्रतिपूर्ती दावा नाकारणा-या रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला ठाणे जिल्हा ग्राहक मंचाने दणका दिला. ग्राहकाने दावा केलेली चार लाख ७४ हजारांची रक्कम तक्रार दाखल झाल्यापासून सहा टक्के व्याजासह आणि त्याव्यतिरिक्त २५ हजार देण्याचे आदेश मंचाने दिले.भिवंडीतील काल्हेर येथे राहणारे नंदकुमार गौर यांनी रिलायन्स जनरल इन्शुअरन्स कंपनीची मे २००८ ते मे २००९ साठी मेडिक्लेम पॉलिसी घेतली होती. याच कालावधीत नंदकुमार यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार आणि नंतर दुसऱ्या रूग्णालयात अ‍ॅन्जोप्लास्टी करण्यात आली. याचा एकूण ४ लाख ७४ हजार रुपये खर्च झाला. याचा प्रतिपूर्ती दावा नंदकुमार यांनी रिलायन्सची प्रतिनिधी संस्था असलेल्या मेडि असिस्ट इंडिया प्रा. लिमिटेडकडे पाठविला. परंतु त्यांनी तो नाकारला. तसेच अनेकदा नोटीस पाठविल्यावरही त्यांनी आपल्या प्रतिपूर्ती दाव्याबाबत कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कंपनीविरोधात नंदकुमार यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)