नवी दिल्ली : लग्नसराईच्या हंगामातही आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांनी मर्यादित खरेदी केल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात मंगळवारी ‘जैसे थे’ स्थिती दिसून आली. मोठ्या मागणीअभावी आज सोन्याचा भाव २७,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर कायम राहिला. दुसरीकडे चांदीचा भावही कोणत्याही बदलाशिवाय ३७,८०० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांच्या मागणीत वाढ न झाल्याने चांदीच्या भावातही कोणताही बदल झाला नाही. सराफा बाजारात सध्या खरेदीला काहीशी मर्यादा आली आहे. लग्नसराईतही खरेदीने जोर धरल्याचे दिसत नाही. जागतिक बाजारातील अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात हा कल दिसून आला. लंडन बाजारात सोन्याचा भाव किरकोळ बदलासह १,१८४.१० डॉलर प्रतिऔंस आणि चांदीचा भाव ०.१८ टक्क्यांनी वाढून १६.२४ डॉलर प्रतिऔंस झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव कोणत्याही बदलाशिवाय अनुक्रमे २७,२५० रुपये आणि २७,१०० रुपये प्रति १0 ग्रॅमवर बंद झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही २३,७०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव ३७,८०० रुपयांवर कायम, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव २०० रुपयांच्या घसरणीसह ३७,७४० रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ५६,००० रुपये व विक्रीकरता ५७,००० रुपये प्रतिकिलोवर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मर्यादित खरेदीने सराफा बाजारात ‘जैसे थे’ स्थिती
By admin | Updated: May 13, 2015 00:54 IST