Join us
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बाजार तेजीत

By admin | Updated: March 3, 2015 00:34 IST

जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याचा भाव १८० रुपयांनी वाढून २७,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीच्या सराफ्यात सोमवारी सोन्याचा भाव १८० रुपयांनी वाढून २७,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. सलग दुसऱ्या दिवशी सराफ्यात तेजी नोंदली गेली आहे. चांदीचा भावही ४०० रुपयांनी वाढून ३७,६०० रुपये प्रतिकिलो राहिला. बाजारातील जाणकारांनी सांगितले की, सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. जागतिक बाजारातील तेजीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची हंगामी मागणी पूर्ण करण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांनी जोरदार खरेदी केली. परिणामी सोन्याच्या भावात वाढ नोंदली गेली. सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.८ टक्क्यांनी वाढून १,२२३.३४ डॉलर प्रतिऔंस झाला. ही १७ फेब्रुवारीनंतरची उच्चांकी पातळी आहे. चांदीचा भावही ०.९ टक्क्यांच्या तेजीसह १६.७४ डॉलर प्रतिऔंस झाला. दिल्ली सराफ्यात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १८० रुपयांनी वधारून अनुक्रमे २७,३०० रुपये व २७,१०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. यात गेल्या सत्रात १२० रुपयांची वाढ नोंदली गेली होती. तथापि, सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २३,७०० रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव ४०० रुपयांनी वाढून ३७,६०० रुपये व साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भावही ५३० रुपयांच्या तेजीसह ३७,०८५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १,००० रुपयांनी वाढून खरेदीकरिता ६०,००० रुपये व विक्रीसाठी ६१,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)