Join us
Daily Top 2Weekly Top 5

शेअर बाजाराला अर्थसंकल्पाचे वेध

By admin | Updated: February 8, 2016 03:31 IST

भारतीय रिझर्व्ह बॅँकेने कायम ठेवलेले दर, चीनमधील मंदीचा बाजाराने घेतलेला धसका, काही आस्थापनांचे जाहीर झालेले निराशाजनक निकाल यामुळे भारतातील शेअ

प्रसाद गो. जोशी - भारतीय रिझर्व्ह बॅँकेने कायम ठेवलेले दर, चीनमधील मंदीचा बाजाराने घेतलेला धसका, काही आस्थापनांचे जाहीर झालेले निराशाजनक निकाल यामुळे भारतातील शेअर बाजारामध्ये गतसप्ताहामध्ये घसरण झाली. परकीय वित्तसंस्थांनी पुन्हा सुरू केलेली खरेदी ही चांगली बाब असली तरी बाजाराला अर्थसंकल्पाचे वेध लागल्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत.मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह हा मंदीचा राहिला. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २५३ अंशांनी घसरून २४६१६.९७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ७४.४५ अंशांनी घसरून ७४८९.१० अंशांवर बंद झाला. बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये बीएसई पॉवर या निर्देशांकाला मोठा फटका बसला. सप्ताहात या निर्देशांकात ५.७० टक्के एवढी मोठी घट झाली.चीनमधील मंदीमुळे जगाला पुन्हा एकदा मंदी ग्रासण्याची भीती वाटत आहे. याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर होत असून भारतीय बाजारही खाली आले. या जोडीलाच गतसप्ताहात जाहीर झालेल्या काही आस्थापनांचे तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेनुसार न आल्याने बाजारावर नाराजीचे मळभ दाटले आणि बाजार खाली आला.या महिन्याच्या अखेरीस सादर होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये काय दडलेय याची बाजाराला उत्कंठा लागली आहे. अर्थसंकल्पापूर्वी नेहमीच बाजार वर खाली होत असतो. बाजारामध्ये व्यवहार कमी प्रमाणामध्ये होत असतात आणि केवळ काही प्रमाणात होणाऱ्या या व्यवहारांना बाजाराची दिशा मानणे चुकीचे असते. सध्या बाजार अर्थसंकल्पाची वाट बघत असल्याने सध्याची घसरण ही तात्पुरती मानली पाहिजे. अर्थसंकल्पापूर्वी बाजारमध्ये एकदा तेजी येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र ही तेजी मर्यादित स्वरुपाची आणि अल्पकालीन असेल असेच संकेत मिळत आहेत.गेल्या काही सप्ताहांपासून कमी होणारे खनिज तेलाचे दर पुन्हा वाढू लागल्याने बाजाराला काहीसा दिलासा मिळाला असला तरी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ते चिंतेचे लक्षण ठरू शकते. सप्ताहाच्या प्रारंभी भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये सर्व दर कायम राखले आहेत. यामुळे व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा फोल ठरली आणि बाजारात त्याची अपेक्षित नकारात्मक प्रतिक्रिया उमटली.