Join us  

budget 2022: आपला पैसा कुठे जातोय? असे घ्या समजून...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 7:37 AM

budget 2022: देशाला आगामी वर्षामध्ये किती महसूल मिळेल आणि किती खर्च होण्याची अपेक्षा आहे, याची एकत्रित नोंद म्हणजे अर्थसंकल्प होय. अर्थसंकल्प सादर होत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या जातात. या संज्ञांचा निश्चित अर्थ काय, हे जाणून  घेतले तर अर्थसंकल्प जाणून घेणे अधिक सुलभ होणार आहे. 

नाशिक : घर असो की कार्यालय, व्यक्ती असो वा संस्था अथवा देश प्रत्येक ठिकाणी पैसा महत्त्वाचा असतो. वर्षभरामध्ये मिळणारे उत्पन्न आणि अपेक्षित खर्च यांची आपणही सांगड घालत असतो. देशाला आगामी वर्षामध्ये किती महसूल मिळेल आणि किती खर्च होण्याची अपेक्षा आहे, याची एकत्रित नोंद म्हणजे अर्थसंकल्प होय. अर्थसंकल्प सादर होत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या जातात. या संज्ञांचा निश्चित अर्थ काय, हे जाणून  घेतले तर अर्थसंकल्प जाणून घेणे अधिक सुलभ होणार आहे. 

तूट (डेफिसीट) : ज्यावेळी सरकारचा वर्षभरातील खर्च हा मिळणाऱ्या महसुलापेक्षा जास्त असतो, त्या वेळी निर्माण होणारा फरक म्हणजे तूट होय. या तुटीचे महसुली आणि वित्तीय असे प्रकार आहेत. अर्थसंकल्पामध्ये जमा होणाऱ्या महसुलापेक्षा कर्मचाऱ्यांचे पगार आणि भांडवलासाठी अधिक खर्च होत असेल तर त्या तुटीला महसुली तूट असे संबोधले जाते. ही तूट भरून काढण्यासाठी सरकार कर्ज काढत असते. अर्थसंकल्पामध्ये जमा होणाऱ्या महसुलापेक्षा कर्ज वगळता खर्च जास्त होत असेल तर त्याला वित्तीय तूट असे नाव दिले जाते. 

निधीचे वाटप (बजेट एस्टिमेट्स): सरकारतर्फे विविध मंत्रालये तसेच विशेष योजनांसाठी खर्चाची तरतूद केली जात असते. याची सविस्तर माहिती यामध्ये दिलेली असते. त्याचबरोबर मागील वर्षामध्ये विविध खात्यांनी केलेला खर्च आणि योजनांची कामगिरी यांचा आढावाही अर्थमंत्री घेत असतात. या भागामध्ये कोणत्या मंत्रालयाला वाढीव अथवा कमी निधी मिळणार आहे, हे समजू शकते. 

सुधारित अंदाज (रिव्हाईज्ड एस्टिमेट्स) : काही कारणामुळे एखादे मंत्रालय अथवा योजनेला आधी जाहीर केल्यापेक्षा अधिक निधी देण्याची गरज पडते, त्यामुळे त्याची तरतूद ही या भागामध्ये केली जाते. मागील दोन वर्षांपासून कोविडमुळे उद्योग क्षेत्राला अधिक मदत द्यावी लागली आहे. त्याचा सुधारित अंदाज अर्थसंकल्पामध्ये देण्यात येत असतो. 

कंपनी कर (कॉर्पोरेट टॅक्स) : कंपन्या अथवा संस्थांना मिळणाऱ्या उत्पन्नावर जो कर द्यावा लागतो, त्याला कंपनी कर असे संबोधले जाते.  

मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स (मॅट) : एखादी कंपनी ही शून्य कर योजनेमधील असली तरी तिला काही प्रमाणात किमान कर द्यावा लागतो. हा कर म्हणजे मॅट होय.

टॅग्स :अर्थसंकल्पबजेट माहिती