Join us  

Budget 2021: सौरऊर्जेसाठी पालिकांना प्रोत्साहन मिळावे; केंद्र सरकारने चालना देणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 1:31 AM

स्मार्ट सिटीचे सगळे विषय तत्काळ मार्गी लागावेत. केंद्र सरकारचा निधी लक्षात घेता, त्याचा विभागवार प्रकल्प खर्च वेळेत झाल्यास आणखी निधीसाठीही केंद्र सरकार सहकार्य करू शकेल.

कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातून आपल्या वाट्याला काही ना काही यावे, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. काय आहे या क्षेत्रांचे मागणे, यावर त्यात्या क्षेत्रातील मान्यवरांची भूमिका..

सौर ऊर्जेचा शहरी भागांमध्ये वापर वाढवण्यासाठी कायद्याचा वचक निर्माण करणे अपेक्षित आहे. सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविणे महागाचे असते. ती अल्प किमतीत बसविण्यासाठी केंद्र सरकारने चालना देणे गरजेचे आहे. त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करावी. - संभाजी चव्हाण, ठाणे

कल्याण-डोंबिवली महापालिकेत स्मार्टसिटीच्या दृष्टीने कामांना वेग यायला हवा. मनपा, महावितरण या यंत्रणांनी समन्वय साधून विकास करायला हवा. केंद्रानेही आणखी निधी द्यावा. जेणेकरून आगामी काळात जास्त विकासकामे होतील. - सागर मोहिते, अध्यक्ष, स्वराज्य प्रतिष्ठान, डोंबिवली

विजेवर चालणाऱ्या खाजगी, सार्वजनिक वाहनांचा वापर ठाण्यासारख्या स्मार्ट शहरात वाढणे अपेक्षित आहे. या वाहनांच्या करामध्ये सवलत द्यावी. वापर करणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा. या वाहनांच्या चार्जिंग केंद्रासाठी तरतूदही करावी. - सुधीर फुटाणे, कार्यकारी अधिकारी, ग्लोबल टेक एंटरप्रायजेस (स्मार्ट सिटी सल्लागार), ठाणे

स्मार्ट सिटीचे सगळे विषय तत्काळ मार्गी लागावेत. केंद्र सरकारचा निधी लक्षात घेता, त्याचा विभागवार प्रकल्प खर्च वेळेत झाल्यास आणखी निधीसाठीही केंद्र सरकार सहकार्य करू शकेल. अर्थसंकल्पात आपल्या पालिकेसाठी जास्तीत जास्त निधी मिळणे महत्त्वाचे आहे. - राजीव तायशेटे, आर्किटेक

स्मार्ट शहरे कधी बघायला मिळणार? जी कामे सुरू आहेत, त्यातून सिग्नल यंत्रणा होणार, असे कळले होते. नुकतेच सीसी कॅमेराचे काम झाले आहे. पण ती पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत. जर मनपाचे स्वतंत्र बजेट आहे, तर स्मार्ट सिटीच्या बजेटची कामे वेगळी व्हायला हवीत. - मनोहर गचके, जागरूक नागरिक

टॅग्स :केंद्र सरकारबजेट 2021