Join us  

Budget 2021: लघुउद्याेगांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी; गृहउद्योगांसाठी भरीव तरतूद करणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2021 12:23 AM

लघुउद्योजकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. केंद्र सरकार अर्थसंकल्पात विविध घोषणा करते.

कोरोनामुळे फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर भर देणारा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. या अर्थसंकल्पातून आपल्या वाट्याला काही ना काही यावे, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. काय आहे या क्षेत्रांचे मागणे, यावर त्यात्या क्षेत्रातील मान्यवरांची भूमिका...

शहरात लहान-मोठ्या उद्याेगांना सुविधा मिळत नसल्याची ओरड होत आहे. कमी भांडवलात जास्त नागरिकांना काम देणाऱ्या या क्षेत्राला अर्थसंकल्पात सवलती द्याव्यात. त्यांना कच्चा माल स्थानिक बाजारपेठेतच उपलब्ध व्हावा तसेच हक्काची बाजारपेठ द्यावी. - रावसाहेब खराते, लघुउद्योजक

लघुउद्योजकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. केंद्र सरकार अर्थसंकल्पात विविध घोषणा करते. मात्र, प्रत्यक्षात कोणताही फायदा होत नाही. त्यांना मार्केट उपलब्ध करून विविध कर बंद करावे. शासनाने कर्जपुरवठ्यातील अडथळे दूर करावेत. - राजू तेलकर, लघुउद्योजक

लॉकडाऊन काळात स्वस्तदरात भाजी विकली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा त्याच भाज्या त्या दरात विकणे बाजारपेठेतील चढउतारामुळे शक्य होत नाही. यंदाच्या बजेटमधून सामान्यांना जोड व्यवसाय आणि त्यासाठी निधीची उपलब्धी नको, पण बाजारपेठ देणारी व्यवस्था हवी. - प्रसाद आपटे, व्यावसायिक

अनलॉकनंतरही चप्पल व्यवसायाला तेजी नाही. नागरिकांची खरेदीची मानसिकता नाही. त्याचा फटका या उद्योगाला बसला आहे. कुटुंबाची गुजराण करणे कठीण आहे. केंद्र, राज्याच्या बजेटमध्ये गटई व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. - राहुल गणोरे, व्यावसायिक

अर्थसंकल्पात गृहउद्योगांसाठी भरीव तरतूद करणे गरजेचे आहे. महिला सक्षमीकरण धोरण सत्यात उतरवायचे असेल तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. कर्जपुरवठा व इतर मदत वेळेवर मिळत नसल्याने अनेक गृहउद्योग डबघाईला आले आहेत. - सुवर्णा संतोष सोनावणे, भिवंडी 

टॅग्स :बजेट 2021