Join us  

Budget 2021: ५०हून अधिक वस्तूंवर आयातशुल्क वाढविला जाण्याची शक्यता; 'या' वस्तू महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 2:59 AM

कोरोना महासाथीमुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली असून सरकारला महसूल प्राप्ती व्हावी यासाठी ५०हून अधिक वस्तूंवर आयातशुल्क वाढविण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. 

नवी दिल्ली : कोरोना महासाथीमुळे घसरलेला अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी ५०हून अधिक वस्तूंवरील आयातशुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याचे समजते. पुढील सोमवारी, १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

कोरोना महासाथीमुळे अर्थव्यवस्थेला घरघर लागली असून सरकारला महसूल प्राप्ती व्हावी यासाठी ५०हून अधिक वस्तूंवर आयातशुल्क वाढविण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. त्यामुळे स्मार्टफोन, फ्रीज, इलेक्ट्रिक कार महागण्याची शक्यता आहे. आयातशुल्कात वाढ करून ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला गती देण्याचा केंद्राचा विचार आहे. आयातशुल्कात ५ ते १० टक्के वाढ केल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीत २०० ते २१० अब्ज रुपयांचा महसूल गोळा होईल, असा अंदाज आहे. 

आयातशुल्कात नेमकी किती वाढ केली जाईल, यासंदर्भात काहीही समजू शकलेले नाही. फर्निचर आणि इलेक्ट्रिक कार यांसारख्या वस्तूंवर आयातशुल्क वाढल्याने आयकेईए आणि टेस्ला यांसारख्या कंपन्या केंद्रावर नाराज होण्याची शक्यता आहे. अलीकडेच टेस्लाने बेंगळुरू येथे इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीचा कारखाना सुरू करण्याचे सूतोवाच केले आहे. आयातशुल्क वाढविल्याने स्थानिक बाजारपेठेतील वस्तूंच्या निर्मितीला चालना मिळून ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला गती येेईल, असे मत एका तज्ज्ञाने नाव न छापण्याच्या अटीवर नोंदवले.

आयातशुल्कात वाढ झाल्यास पुढील वस्तू महागणार

टीव्ही, लॅपटॉप, स्मार्टफोन्स, टॅब, महागडे फर्निचर, इंधनावरील कार, इलेक्ट्रिक कार 

टॅग्स :बजेट 2021निर्मला सीतारामन