Join us  

अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारात प्रचंड निराशा, सेंसेक्स 650 अंकांनी घसरला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 2:06 PM

budget 2020 impact on share market ( Updated ) : अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

नवी दिल्ली -  वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत शेअर बाजारामध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील सुचकांक असलेला सेंसेक्स 650 अंकांनी घसरला. तर निफ्टीसुद्धा 250 हून अधिक अंकांनी घसरला.  देशावर असलेले मंदीचे सावट आणि बाजारातील सुस्ती यामुळे अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी आज सकाळपासूनच शेअर बाजारामध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत होते. आज बाजार सुरू झाल्यानंतर सेंसेक्समध्ये सुरुवातीलाच 600 अंकांनी घसरण झाली होती. त्यानंतर काही काळ सेंसेक्स सावरला होता. मात्र निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात उद्योग क्षेत्रासाठी फार मोठ्या घोषणा करण्यात न आल्याने वित्तमंत्र्यांचे भाषण आटोपल्यानंतर शेअर बाजारामध्ये प्रचंड निराशा पसरली. त्यामुळे विक्रीचा दबाव वाढल्याने सेंसेक्स 650 हून अधिक अंकांनी घसरला. 

केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण आज अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून करदात्यांना दिलासा देण्यात आला असून, करदात्यांच्या कररचनेत बदल करण्यात आलेला आहे. त्याबरोबरच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीबाबत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा करण्यात आली आहे. एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच आयडीबीआय बँकेमधील आपली भागीदारीसुद्धा सरकार विकणार आहे. कृषिक्षेत्रासाठीही आजच्या अर्थसंकल्पामधून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांचा सर्वांगीन विकास करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 16 कलमी विशेष कृती योजना जाहीर केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना विविध सोईसवलती पुरवण्याची घोषमा वित्तमंत्र्यांनी केली आहे. 

टॅग्स :बजेटशेअर बाजारनिर्देशांक