Join us

फक्त ५०० रुपयांत मिळणार बीटी कापूस बियाणे

By admin | Updated: March 15, 2015 23:45 IST

बीटी कापूस बियाणे कुठे ८५०, तर कुठे ९५० रुपयांत विकले जाते. या किमतीची तफावत असू नये. नफेखोरी बंद केली जाईल

जळगाव : बीटी कापूस बियाणे कुठे ८५०, तर कुठे ९५० रुपयांत विकले जाते. या किमतीची तफावत असू नये. नफेखोरी बंद केली जाईल. तसेच कापूस उत्पादकांना बीटी कापूस बियाणे ५०० रुपये प्रतिबॅग या दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन कृषी व महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे केले. जैन हिल्सवर आयोजित आंतरराष्ट्रीय केळी परिषदेचे उद्घाटन खडसे यांच्या हस्ते रविवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन, खासदार ईश्वरलाल जैन, खासदार ए. टी.पाटील आदी उपस्थित होते. फवारणीची औषधे, काही खते किमान मूल्यापेक्षा कमी दरात विकल्या जातात. फवारणी औषधाच्या बाटलीवर ९०० रुपये किंमत असली, तर ते ८०० ते ६०० रुपयांमध्येही विकले जाते. असेच बीटी कापूस बियाण्यांच्या संबंधातही होते. नफेखोरी रोखण्यासाठी राज्य शासन कायदा आणणार आहे. त्यात नफेखोरीची तक्रार आली आणि ती खरी असली तर गुन्हेगाराला थेट जेलमध्ये टाकले जाईल. खते व बियाणे यावर होणारा शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. तसेच रोगराईसंबंधी शेतकऱ्यांना गावात मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रत्येक गावात कृषी सहायक नियुक्त केला जाईल. तो शेतात जाऊन समस्येचे निराकरण करेल, असेही खडसेंनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)