Join us

शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्समध्ये ४८५ अंकांची वाढ

By admin | Updated: May 26, 2016 16:31 IST

सलग दुस-या दिवशी गुरुवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५०० अंकांच्या जवळपास वाढ नोंदवली.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ - सलग दुस-या दिवशी गुरुवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५०० अंकांच्या जवळपास वाढ नोंदवली. अपेक्षेपेक्षा देशातंर्गत कंपन्यांची चांगली कामगिरी आणि जागतिक तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे सेन्सेक्सने चांगली कामगिरी केली. 
 
डॉलरच्या तुलनेत मजबूत होणारा रुपया, सरासरीपेक्षा जास्त मान्सूनचा पाऊस आणि इराणबरोबरचा छाबहार बंदर करार यामुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. कालही मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने ५०० अंकांची वाढ नोंदवली होती. गुरुवारी बीएसई सेन्सेक्स ४८५ अंकांच्या वाढीसह २६,३६६ अंकांवर बंद झाला. 
 
काल २५,८८१ अंकांवर बंद झाला होता. बाजाराने गुरुवारी १.८८ टक्क्यांची वाढ नोंदवली. लार्सन अँड टुब्रो, गेल इंडिया लिमिटेड या देशी कंपन्यांच्या नफ्यात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ दिसून आली. प्रतिबॅरल तेल पिंपाचा दर ५० डॉलरच्या पुढे गेला आहे. वर्षभरात प्रथमच ही वाढ झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८८ अंकांच्या वाढीसह ८०२३ वर बंद झाला.