Join us

मुंबई शेअर बाजार २४४ अंकांनी वाढला

By admin | Updated: April 7, 2015 01:06 IST

रिझर्व्ह बँकेची द्विमासिक आढावा बैठक मंगळवारी होत असताना सोमवारी शेअर बाजारांत तेजीचे वातावरण दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स

मुंबई : रिझर्व्ह बँकेची द्विमासिक आढावा बैठक मंगळवारी होत असताना सोमवारी शेअर बाजारांत तेजीचे वातावरण दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २४४ अंकांनी वाढून २८,५0४.४६ अंकांवर बंद झाला. आरोग्य आणि रिअल्टी क्षेत्रातील समभागांत जोरदार खरेदी झाल्यामुळे शेअर बाजारास बळ मिळाले.३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी मजबुतीसह उघडला होता. त्यानंतर मात्र तो घसरून २८,२२१.९९ अंकांपर्यंत खाली गेला होता. त्यानंतर आरोग्य, रिअल्टी आणि एफएमसीजी कंपन्यांच्या समभागांत जोरदार खरेदी झाली. त्याचा लाभ मिळून सेन्सेक्स भरभर वर चढला. सत्र अखेरीस दोन आठवड्यांचा उच्चांक गाठून सेन्सेक्स २८,५0४.४६ अंकांवर बंद झाला. 0.८६ टक्के अथवा २४४.३२ अंकांची वाढ त्याने नोेंदविली. १८ मार्च रोजी सेन्सेक्स २८,६२२.१२ अंकांवर बंद झाला होता.५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील निफ्टी ८,६00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला. ७३.६५ अंक अथवा 0.८६ टक्क्यांची वाढ नोंदवून तो ८,६५९.९0 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील सन फार्माचा समभाग सर्वाधिक ८.३४ टक्के वाढून १,१६८.५0 अंकांवर बंद झाला. हा या समभागाचा सार्वकालिक उच्चांक ठरला. सिप्लाचा समभाग ३.५९ टक्के, तर डॉ. रेड्डीजचा समभाग ४.३३ टक्के वाढला. मार्च महिन्यात वस्तू उत्पादन क्षेत्राने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्याचा लाभ बाजाराला मिळाला. दुसऱ्या बाजूने बँकिंग क्षेत्राची कामगिरी मात्र निराशाजनक राहिली. रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य निर्णयाचे दडपण या क्षेत्रावर होते. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक आॅफ इंडिया या प्रमुख कंपन्यांचे समभाग घसरले. जागतिक बाजार इस्टर सुट्यांमुळे बंद होते. त्यामुळे भारतीय बाजारांवर बाह्य प्रभाव दिसून आला नाही. (वृत्तसंस्था)