नवी दिल्ली : जगातील पाच प्रभावशाली देशांचा समूह असलेल्या ‘ब्रिक्स’ची आठवी शिखर परिषद येत्या आॅक्टोबरमध्ये गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे. जगात ‘ब्रिक्स’चे सदस्य असलेल्या या पाच देशांची लोकसंख्या ४२ टक्के आहे आणि या देशांचे सकल राष्ट्रीय उत्पादन १६००० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे.आठवे ‘ब्रिक्स’ संमेलन गोव्यात आयोजित करण्यात येईल, असे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी जाहीर केले. स्वराज यांनी या शिखर संमेलनाची वेबसाईट आणि प्रतीक चिन्हाचे (लोगो) अनावरण केले. या वर्षी ‘ब्रिक्स’ समूहाचे अध्यक्षपद भारताकडे आहे.सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘ब्रिक्सची प्रक्रिया प्रशंसनीय पद्धतीने पुढे नेल्याबद्दल मी रशियन महासंघाचे अभिनंदन करते. रशियन महासंघाने जुलै २०१५ मध्ये उफा या अतिशय सुंदर अशा शहरामध्ये सातव्या ब्रिक्स संमेलनाचे आयोजन केले होते. ब्रिक्सचे आठवे शिखर संमेलन गोवा येथे १५ आणि १६ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे हे सांगताना मला मोठा आनंद होतो आहे.’‘ब्रिक्स अंडर-१७ फुटबॉल सामने, ब्रिक्स चित्रपट महोत्सव, ब्रिक्स वेलनेस फोरम, ब्रिक्स युथ फोरम, यंग डिप्लोमॅट्स फोरम, ब्रिक्स व्यापार मेळा, ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह, ब्रिक्स थिंक टँक आणि ब्रिक्स शैक्षणिक मंच यांसारखे कार्यक्रम राबविण्यात येतील,’ असेही स्वराज यांनी सांगितले.(वृत्तसंस्था)
गोव्यात आॅक्टोबरमध्ये ‘ब्रिक्स’ शिखर परिषद
By admin | Updated: March 23, 2016 03:38 IST