Join us

२४ आठवडे आधी विमान तिकीट बुक करणे फायदेशीर

By admin | Updated: May 4, 2017 01:04 IST

जगभरातील लोकप्रिय स्थळांना भेटी देण्यासाठी २४ आठवडे आधी विमानाचे तिकीट बुक करणे फायदेशीर असल्याचे

नवी दिल्ली : जगभरातील लोकप्रिय स्थळांना भेटी देण्यासाठी २४ आठवडे आधी विमानाचे तिकीट बुक करणे फायदेशीर असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.आॅनलाइन ट्रॅव्हल पोर्टल स्कायस्कॅनरने हा अभ्यास केला. सुमारे २ वर्षांची आकडेवारी त्यासाठी वापरण्यात आली आहे. दरमहा होणाऱ्या सुमारे ५0 दशलक्ष लोकांच्या तिकीट बुकिंगचा अभ्यास यात करण्यात आला. यानिमित्त करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ३१ टक्के लोकांनी १२ आठवडे आधी तिकीट बुक करणे सर्वांत चांगले असल्याचे सांगितले. ११ टक्के लोकांनी शेवटच्या आठवड्यात तिकीट बुक करणे चांगले असल्याचे नमूद केले. तथापि, स्कायस्कॅनरने केलेल्या डाटा विश्लेषणातून असे निदर्शनास आले की, २४ आठवडे आधी विमान तिकीट बुक करणे सर्वांत चांगले आहे.विदेशात प्रवासास जाणाऱ्या भारतीयांच्या तिकीट बुकिंगचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सर्वेक्षणानुसार, भारतीयांच्या सर्वांत आवडीची ठिकाणे असलेल्या बाली आणि क्वालालंपूर या पर्यटन स्थळांसाठी २५ आठवडे आधी विमान तिकीट बुक केल्यास सर्वांत स्वस्त मिळू शकते. तथापि, आॅनलाइन पोर्टलला असे आढळून आले की, दोन्ही स्थळांसाठी प्रवासाच्या दोन आठवडे आधी सर्वाधिक तिकिटांचे बुकिंग होते. सर्वाधिक मागणीमुळे या काळात बाली आणि क्वालालंपूरची तिकिटे अनुक्रमे १६ ते ११ टक्के महाग मिळतात. (लोकमत न्यूज नेटवर्क)बुकिंग कधी करावे, याचे योग्य ज्ञान नसल्यामुळे भारतीय ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतात. ७२ टक्के भारतीय प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी योग्य वेळ कोणती, याचे ज्ञान नाही, असे अभ्यासात आढळून आले.युरोपातील अ‍ॅमस्टरडॅमसारख्या ठिकाणांसाठी २४ आठवडे आधी तिकीट बुक केल्यास विमान भाड्याची सुमारे १७ टक्के रक्कम प्रवासी वाचवू शकतात, असे अभ्यासातून समोर आले आहे.