नवी दिल्ली : कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणी अग्रणी उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला आणि इतरांसंबंधी क्लोजर रिपोर्टला एवढी घाई का? असा सवाल करीत सीबीआयचे विशेष न्यायाधीश भारत पाराशर यांनी तपास अधिकाऱ्याला फटकारले.सीबीआयने बिर्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करीत खळबळ उडवून दिली होती. हे प्रकरण बंद करण्यासाठी एवढी घाई का? असा सवाल पाराशर यांनी केल्यानंतर तपास अधिकाऱ्याने छाननी समितीच्या बैठकीचे मूळ इतिवृत्त गहाळ झाल्याचे नमूद केले. बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला खाणपट्टे देण्याचा निर्णय समितीने घेतला होता. या बैठकीचे इतिवृत्त गहाळ झाले असे सांगणारे काही दस्तऐवज असतील तर ते दाखवा, असा सवाल पाराशर यांनी केला. तसे निवेदन कुणीही दिलेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी तपास अधिकाऱ्याला उत्तर न देता आल्याने न्यायाधीशांनी निगराणी ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला पाचारण करण्याचा आदेश दिला.‘त्या’ याचिकांवर सुनावणी नाहीबेकायदेशीररीत्या खाणपट्टे मिळविल्याचा ठपका असलेल्या कंपन्यांच्या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. खाणपट्टे रद्द करण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती या कंपन्यांनी सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या खंडपीठाकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाने २१८ खाणपट्ट्यांचे वाटप बेकायदा ठरविले असून त्यांच्या भवितव्याबाबत निर्णय राखून ठेवला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बिर्लांच्या क्लोजर रिपोर्टला एवढी घाई का?
By admin | Updated: September 13, 2014 05:09 IST