Join us  

Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 2:54 PM

Binance Crypto Founder: जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्स्चेंज Binance संस्थापक चांगपेंग झाओ यांना ४ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्स्चेंज Binance संस्थापक चांगपेंग झाओ (Changpeng Zhao) यांना ४ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. सायबर गुन्हेगार आणि दहशतवादी समूहांना त्याच्या एक्स्चेंजवर व्यापार करण्यापासून रोखलं नसल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय.  

Binance हे जगातील सर्वात मोठे क्रिप्टो एक्स्चेंज आहे. या एक्स्चेंजकडे सर्वाधिक ६५ अब्ज डॉलरची क्रिप्टो असेट आहे. Binance चे संस्थापक चांगपेंग झाओ हे क्रिप्टो प्रेमी CZ म्हणूनही ओळखले जातात. CZ यांच्याकडे कोट्यवधी डॉलर्सची मालमत्ता आहे. फोर्ब्सनुसार, झाओ यांची नेटवर्थ ३३०० कोटी डॉलर म्हणजेच जवळपास २.७५ लाख कोटी रुपये आहे. 

काय आहेत आरोप? 

अमेरिकेच्या न्याय विभागानं दिलेल्या माहितीनुसार, जगातील सर्वात मोठं क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज Binance.com चालवणाऱ्या बायनॅन्स होल्डिंग्स लिमिटेड (Binance Holdings Linited) या संस्थेनं मनी लॉन्ड्रिंग, विनापरवाना मनी ट्रान्समिशन आणि नियमांचं उल्लंघन केल्याची कबुली दिली आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेच्या कॉर्पोरेट इतिहासात कोणत्याही अधिकाऱ्याला ठोठावण्यात आलेली ही सर्वात मोठी क्रिमिनल पेनल्टी आहे. 

बायनॅन्स यांच्यावर 'टेरर फायनान्सिंग'कडे दुर्लक्ष केल्याचा ही आरोप आहे. हमासशी संबंधित काही संशयास्पद व्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला असून बायनॅन्सनं याची माहिती दिली नाही. अमेरिका आणि इतर काही देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या गटांशी त्यांचा संबंध आहे. यात इस्लामिक स्टेट, हमास, अल कायदा आणि पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद यांचा समावेश आहे.

याशिवाय कंपनीवर अनेक आरोप 

याशिवाय असाही आरोप करण्यात आलाय की बायनॅन्सने केवायसी तपासणीशिवाय अब्जो डॉलर्सचे क्रिप्टो व्यवहार केले आहेत. बायनॅन्स वॉलेट्सनं हायड्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियन डार्कनेट मार्केटप्लेसशी व्यवहार केला. बायनॅन्सच्या स्वतःच्या कम्प्लायन्स अधिकाऱ्यानं सांगितलं की एक्सचेंजचं मनी लॉन्ड्रिंग विरोधी नियंत्रण पुरेसं नाही आणि ते गुन्हेगारांना प्लॅटफॉर्मवर सामावून घेऊ शकतात. एफटीएक्स घोटाळ्याशीही बायनॅन्सचं नाव जोडलं जात होतं. हा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी बायनॅन्स काही माहिती लीक केल्याचा आरोप केला जात होता. 

कंपनीनं काय म्हटलं? 

बायनॅन्सकडून यासंदर्भात एक निवेदन जारी करण्यात आलंय. स्टार्टअप म्हणून सुरू झालेली ही कंपनी खूप वेगानं वाढली आहे. कंपनीची वाढ जितकी वेगवान होती तितकीच ती स्वतःला अनुकूल बनवू शकली नाही आणि वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रात आम्ही काही चुकीचे निर्णयही घेतले आणि आम्ही याची जबाबदारीही घेतो.

 

टॅग्स :क्रिप्टोकरन्सीअमेरिका