Join us
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीच्या तुफानात वर्षातील सर्वाधिक साप्ताहिक घट

By admin | Updated: June 7, 2015 21:21 IST

रिझर्व्ह बॅँकेने केलेल्या दरकपातीमुळे व्याजदरात घट होणार असली तरी यंदा मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात येण्याचा हवामान खात्याचा अंदाज बाजाराची चिंता वाढविणारा ठरला.

प्रसाद गो. जोशीरिझर्व्ह बॅँकेने केलेल्या दरकपातीमुळे व्याजदरात घट होणार असली तरी यंदा मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात येण्याचा हवामान खात्याचा अंदाज बाजाराची चिंता वाढविणारा ठरला. त्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी विक्री होऊन निर्देशांक २७ हजारांच्या खाली घसरला. ग्रीसने नाणेनिधीचे कर्ज फेडणे पुढे ढकलल्याने जगभरातील शेअर बाजारांमध्ये नरमाईचेच वातावरण राहिले.मुंबई शेअर बाजाराची सुरुवात काहीशी निराशेच्या वातावरणात झाली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये घट केल्याने बाजारात उत्साह निर्माण होऊ लागला. त्यापाठोपाठ हवामान खात्याने यंदा मान्सून कमीप्रमाणात येण्याची शक्यता वर्तविली. यामुळे आगामी काळात व्याजदर कमी होण्याची शक्यता कमी होतानाच चलनवाढीचा धोकाही दिसू लागल्याने गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेत मोठ्या प्रमाणावर विक्री केली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक आठवडाभरात ३.८ टक्क्याने कमी होऊन २६,७६८.४९ अंशांवर बंद झाला.सप्ताहभरात या निर्देशांकांत सुमारे १0६0 अंशांनी घट झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३.७८ टक्के म्हणजेच ३१८.९५ अंशांनी कमी होऊन ८११४.७0 अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅम या क्षेत्रीय निर्देशांकामध्येही मोठी घट झाली. बाजारात सर्व दूर झालेल्या विक्रीने निर्देशांकांनी चालू कॅलेंडर वर्षातील सर्वाधिक घट नोंदविली. कमी पावसामुळे देशातील भाववाढ होऊन चलनवाढ होण्याचा धोकाही वाढला आहे. परिणामी रिझर्व्ह बँकेकडून आणखी व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी होऊ लागली आहे. परकीय वित्त संस्थांनी गत सप्ताहामध्ये १२0३.0२ कोटी रुपयांची विक्री केल्याने आधीच घसरणीला लागलेल्या बाजाराचा निर्देशांक २७ हजार अंशांच्या खाली आणला. सप्ताहाच्या अखेरीस काही प्रमाणात खरेदीदार बाजारात दिसू लागले असले तरी आधी झालेली मोठी पडझड भरून काढणे शक्य झाले नाही.अडचणीत सापडलेल्या ग्रीसने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जाची परतफेड लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी युरोपातील आर्थिक समस्या आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.