मुंबई : सर्वाधिक काळा पैसा रिअल इस्टेट क्षेत्रात अर्थात जमीन-जुमल्याच्या व्यवहारांतच निर्माण होत असल्याचा निष्कर्ष इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाऊंटंटस्आॅफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेने काढला आहे. काळ्या पैशावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही संस्थेने केली आहे.आयसीएआयने यासंबंधीचे एक निवेदन अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठविले आहे. निवेदनात म्हटले आहे की, देशातील जमीन-जुमल्याच्या व्यवहारांत सुधारणा आणण्याची गरज आहे. या क्षेत्रातील काळ्या पैशावर प्रशासनाची नजर असायला हवी. त्यासाठी विशेष यंत्रणा तयार करण्याचीही गरज आहे. सर्वाधिक काळा पैसा जमीन-जुमल्याच्या पैशात ओतला जातो. या क्षेत्रात सध्या अनेक समस्या आहेत. नियम आणि दिशानिर्देश यांच्यामार्फत हे क्षेत्र चालविले जाऊ शकत नाही. या क्षेत्रात मागणी आणि पुरवठ्यातील मोठे असंतुलन आहे. त्यादृष्टीनेही त्याच्याकडे पाहायला हवे. या सर्व समस्यांचा अंतिमत: ग्राहकांनाच फटका बसतो. त्यादृष्टीनेच त्याकडे पाहायला हवे, असे संस्थेने निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
‘जमीन-जुमल्या’त सर्वाधिक काळा पैसा
By admin | Updated: December 8, 2014 02:05 IST