Join us  

सार्वजनिक वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 4:32 AM

वैयक्तिक वापराच्या मोटारी व दुचाकींच्या तुलनेत सार्वजनिक वाहतुकीच्या वाहन विक्रीत आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

मुंबई  - वैयक्तिक वापराच्या मोटारी व दुचाकींच्या तुलनेत सार्वजनिक वाहतुकीच्या वाहन विक्रीत आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. घरगुती प्रवासी वाहने व दुचाकींच्या विक्रीत मागील वर्षीपेक्षा (एप्रिल-जून २०१७) अनुक्रमे १७.९८ टक्के व १५.९२ टक्क्यांची वाढ झाली असताना, आॅटो रिक्षांची विक्री मात्र तब्बल ६४.४८ टक्क्यांनी वाढली आहे.सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सिआम) २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल ते जून २०१८) आकडे जाहीर केले आहेत. त्यानुसार, आॅटोमोबाइल उद्योगांनी या काळात ८० लाख ६४ हजार २३९ गाड्यांचे उत्पादन केले. त्यात प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, तीन चाकी व खासगी मोटारींचा समावेश आहे. मागील वर्षी याच काळात (एप्रिल-जून २०१७) कंपन्यांनी ६९ लाख १९ हजार ४१४ वाहनांची निर्मिती केली होती. या वर्षी पहिल्या तिमाहीत उत्पादनात १६.५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तीन चाकी वाहनांखेरीज युटिलिटी श्रेणीतील प्रवासी वाहनांच्या विक्रीतही २३.२२ व व्हॅन श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत २७.२९ टक्के वाढ दिसून आली आहे. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही मागील वर्षीपेक्षा या तिमाहीत ५१.५५ टक्क्यांची वाढ झाली. मध्यम व्यावसायिक वाहनांची विक्री तब्बल ८३.५९ व हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री ३६.५१ टक्क्यांनी वाढली.प्राधान्यही वाढलेवाढते इंधनदर, तसेच वाहतूककोंडीमुळे ग्राहक स्वत:ची गाडी वापरण्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य देत आहेत. त्यामुळेच आॅटोरिक्षा, व्हॅन्स, प्रवासी युटिलिटी वाहनांच्या विक्री वाढली आहे, असे सिआमने म्हटले आहे.

टॅग्स :व्यवसायबातम्या