Join us  

जॅक मा परतताच मोठा निर्णय; अलिबाबाचे सहा तुकडे होणार, कंपनी सावरण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 7:57 AM

चीन सरकारने अलिबाबाला मोठा दंड ठोठावला होता. यामुळे कंपनीचे शेअर्स कोसळले. दोन वर्षांत अलिबाबाचे शेअर ७५ टक्के कोसळले होते. याचा परिणाम जॅक मा यांच्या नेटवर्थवरही झाला होता.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती राहिलेले चीनच्या अलिबाबा कंपनीचे संस्थापक जॅक मा तीन वर्षांनी सार्वजनिकरित्या दिसले आहेत. चीन सरकारविरोधात बोलल्यानंतर मा कुठे गायब झालेले कुणालाही माहिती नव्हते. अधून मधून कुठल्यातरी देशात दिसल्याच्या बातम्या येत होत्या. परंतू, ठोस असे काहीच हाती लागत नव्हते. आता जॅक मा आल्यानंतर अलिबाबा कंपनीबाबत महत्वाची माहिती हाती आली आहे. 

अलिबाबाचे बेपत्ता संस्थापक जॅक मा तीन वर्षांनी शाळेत प्रकटले, कुठे होते? कोणीच ओळखले कसे नाही...

अजस्त्र डोलारा असलेल्या अलिबाबा कंपनीचे सहा तुकडे करण्याची योजना आखली जात आहे. जॅक मा यांनी २५ वर्षांपूर्वी या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीचा व्यवसाय अनेक क्षेत्रांत आहे. अलिबाबाची फायनान्शिअल कंपनी अँट ग्रुपचा ३७ अब्ज डॉलर्सचा आयपीओ आणण्याची तयारी २०२० मध्ये करण्यात आली होती. परंतू चिनी सरकारने अखेरच्या क्षणी हा आयपीओ रद्द केला होता. या वरून जॅक मा यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. 

यानंतर चीन सरकारने अलिबाबाला मोठा दंड ठोठावला होता. यामुळे कंपनीचे शेअर्स कोसळले. दोन वर्षांत अलिबाबाचे शेअर ७५ टक्के कोसळले होते. याचा परिणाम जॅक मा यांच्या नेटवर्थवरही झाला होता. आता अलिबाबा कंपनी सहा भागात विभागली जाणार आहे. या प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा सीईओ आणि संचालक असेल. यापैकी पाच कंपन्यांना त्यांचा आयपीओ आणण्याचे आणि परदेशी गुंतवणूक आणण्याचे अधिकार असणार आहेत. 

अलिबाबा समूहाचे अध्यक्ष आणि सीईओ डॅनियल झांग यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीचे विभाजन केल्याने आपला व्यवसाय अधिक चांगला वाढेल. अलिबाबाचे विभाजन करून स्थापन झालेल्या कंपन्यांमध्ये क्लाउड इंटेलिजन्स ग्रुप, ताओबाओ ट्माल कॉमर्स ग्रुप, लोकल सर्व्हिसेस ग्रुप, कॅनियाओ स्मार्ट लॉजिस्टिक, ग्लोबल डिजिटल कॉमर्स ग्रुप आणि डिजिटल मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप यांचा समावेश आहे. या बातमीमुळे अलिबाबाचे यूएस-लिस्टेड शेअर्स मंगळवारी 10 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. 

टॅग्स :अलीबाबाजॅक मा