Join us  

ठेवीदारांना मोठा धक्का, एचडीएफसीसह अन्य दोन बँकांनी घटवले मुदत ठेवींवरील व्याजदर

By बाळकृष्ण परब | Published: November 17, 2020 9:12 AM

Banking Sector News : मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना धक्का देणारा निर्णय एचडीएफसी बँकेसह अन्य दोन बँकांनी घेतला आहे.

ठळक मुद्दे एचडीएफसी बँकेने आपल्या काही मुदत ठेवींवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहेअ‍ॅक्सिस बँकेनेसुद्धा एफडीवरील व्याजदरांमध्ये बदल केला आहेनवे दर १३ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत

मुंबई - देशाच्या खासगी क्षेत्रामधील सर्वात मोठी कर्जदाती बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने आपल्या काही मुदत ठेवींवरील व्याजदर घटवण्याचा निर्णय घेतला आहे. एक आणि दोन वर्षांमध्ये मॅच्युअर होणाऱ्या मुदत ठेवींवरील व्याज दर कमी केले असल्याचे एचडीएफसी बँकेने सांगितले आहे. याशिवाय इतर सर्व मुदतीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये बँकेंने कुठलाही बदल  केलेला नाही. नवे व्याजदर हे १३ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. एचडीएफसी बँकेने ऑक्टोबर महिन्यातसुद्धा एफडीच्या व्याज दरांमध्ये बदल केला होता.एचडीएफसी बँकेच्या मुदत ठेवींवरील नवे व्याजदर पुढील प्रमाणे आहेत. ७ ते १४ दिवस आणि १५ ते २९ दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडींवर आता २.५ टक्के व्याज मिळेल. तर ३० ते ४५ दिवस आणि ४६ ते ६० दिवस तसेच ६१ ते ९० दिवसांच्या एफडींवर आता ३ टक्के व्याज मिळेल. याशिवाय ९१ दिवसांपासून ६ महिन्यांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडींवर ३.५ टक्के व्याज आणि ६ महिने ते ९ महिने आणि ९ महिने ते एक वर्षापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ४.४ टक्के व्याज मिळेल. एक आणि दोन वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर ४.९ टक्के, दोन ते तीन वर्षांच्या व्याजदरांवर ५.१५ टक्के, तीन ते ५ वर्षांच्या मुदत ठेवींवर ५.३० टक्के आणि पाच ते १० वर्षांच्या दरम्यान मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ५.५० टक्के व्याज मिळेल.अ‍ॅक्सिस बँकेनेसुद्धा एफडीवरील व्याजदरांमध्ये बदल केला आहे. नवे दर १३ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. अ‍ॅक्सिस बँक ७ ते २९ दिवसांच्या एफडीवर २.५ टक्के, ३० दिवसांपासून ३ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ३ टक्के, ३ महिन्यांपासून सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ३.५ टक्के व्याज देत आहेत. याशिवाय ग्राहकांना सहा महिन्यांपासून ११ महिने २५ दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ४.४० टक्के व्याज देण्यात येत आहे. तर ११ महिने २५ दिवसांपासून एक वर्ष ५ दिवसांपर्यंतच्या एफडीवर ५.१५ टक्के व्याज देण्यात येत आहे. १८ महिन्यांपासून २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ५.२५ व्याजदर आहे. तर दीर्घ मुदतीच्या २ ते पाच वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर ५.४० टक्के आणि ५ ते १० वर्षांच्या एफडीवर ५.५० टक्के व्याजदर देण्यात येत आहे.

तर आयसीआयसीआय बँक ७ ते २९ दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या टर्म डिपॉझिटलर ग्राहकांना २.५ टक्के व्याज देत आहे. तर ३० ते ९० दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर ३ टक्के. ९१ ते १८४ दिवसांच्या मुदत ठेवींवर ३.५ टक्के आणि १८५ दिवस ते एक वर्षापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ४.४ टक्के व्याज देण्यात येत आहे. एक ते दीड वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ४.९ टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय १८ महिने ते २ वर्षांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर ५ टक्के व्याज मिळेल. बँका आता २ ते ३ वर्षांच्या मिड टर्म फिक्स डिपॉझिटवर ५.१५ टक्के व्याज देत आहे. तर ३ ते पाच वर्षांपर्यंतच्या एफडीवर ५.३५ आणि ३ ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर ५.५० टक्के व्याज देण्यात येत आहे.

 

टॅग्स :बँकिंग क्षेत्रएचडीएफसीआयसीआयसीआय बँकगुंतवणूक