Join us  

'या' गुंतवणूक योजना आहेत महिलांसाठी सर्वोत्तम; पैसा वाढेल, टॅक्समध्येही मिळेल सवलत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2024 5:05 PM

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत, याद्वारे महिला पैशांची बचत करु शकतात आणि यासह टॅक्समध्येही सवलत मिळते.

केंद्र सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू करत असते. महिला देखील मोठ्या प्रमाणात नोकरी आणि व्यवसाय करतात. याआधी महिलांसाठी वेगळा टॅक्स स्लॅब होता आणि त्यांना पुरुषांपेक्षा जास्त सूट मिळत होती. पण, आता टॅक्स स्लॅबमध्ये लिंगाच्या आधारावर कोणतीही शिथिलता नाही.

सध्या महिलांसाठी अनेक योजना आहेत, याद्वारे महिला मोठ्या प्रमाणात पैशाची बचत करु शकतात. यात अनेक पर्याय आहेत, यामध्ये गुंतवणूक करून महिलांना चांगला परतावा मिळू शकतो. याशिवाय, महिलांना टॅक्समध्ये सूटही मिळू शकते.

अनिल अंबानींना 'अच्छे दिन', इन्फ्रा कंपनीनं फेडलं कर्ज; शेअरमध्ये तुफान तेजी

महिला सन्मान बचत पत्र योजना महिलांसाठी आहे. यामध्ये नोकरी करणाऱ्या किंवा व्यावसायिक महिला तसेच अल्पवयीन मुली त्यांच्या पालकांच्या मदतीने गुंतवणूक करू शकतात. ही योजना FD म्हणजेच मुदत ठेवीप्रमाणे काम करते. यामध्ये गुंतवणूक १ हजार रुपयांपासून सुरू होते आणि तुम्ही २ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकता. त्यावर ७.५ टक्के व्याज मिळते.

महिला सन्मान बचत 

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये वेगळी कर सूट नाही, पण तुम्हाला व्याजाच्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही. तुम्ही योजनेत ५०,००० रुपये गुंतवल्यास, तुम्हाला २ वर्षांनी ५८,०११ रुपये मिळतील. तर १ लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला १,१६,०२२ रुपये आणि २ लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला २,३२,०४४ रुपये मिळतील.

या योजनेची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात केली होती. महिला सन्मान बचत पत्र योजनेचा लाभ फक्त मार्च २०२५ पर्यंत घेता येऊ शकतो.

सुकन्या समृद्धी योजना

जर तुम्ही १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाची आई असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत २५० रुपयांमध्ये खाते उघडू शकता. यामध्ये तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपये जमा करू शकता. या गुंतवणुकीवर करात सूटही मिळते. व्याज दर वार्षिक ८.२ टक्के आहे.

या योजनेंतर्गत फक्त दोन मुलींसाठीच खाते उघडता येते. मात्र, जर कुटुंबात आधीच मुलगी असेल आणि त्यानंतर जुळ्या किंवा त्यापेक्षा जास्त मुली एकत्र जन्माला आल्या तर त्याही योजनेच्या लाभार्थी होऊ शकतात. 

एलआयसीची आधारशिला पॉलिसी

LIC ची आधार शिला पॉलिसी (LIC Aadhaar Shila Plan) देखील आर्थिक दृष्टिकोनातून महिलांसाठी एक उत्तम योजना आहे. ही एक नॉन-लिंक्ड वैयक्तिक जीवन विमा योजना आहे. यामध्ये केवळ ८ ते ५५ वयोगटातील महिलाच गुंतवणूक करू शकतात. या पॉलिसीची मुदत किमान १० आणि कमाल २० वर्षांसाठी आहे. या योजनेंतर्गत महिलांना कर्जाचा लाभही मिळतो.

यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला मॅच्युरिटीवर निश्चित रक्कम मिळते. पॉलिसी परिपक्व होण्यापूर्वी गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास, कुटुंबाला आर्थिक मदतही मिळते. या प्रकरणात, एलआयसी नॉमिनीला किमान ७५,००० रुपये मूळ विमा रक्कम म्हणून देते. तसेच तुम्हाला कमाल ३ लाख रुपये मिळू शकतात.

टॅग्स :करव्यवसाय