Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बीटी कापसापासून सावधान!

By admin | Updated: April 27, 2015 23:09 IST

तणनाशक तंत्रज्ञान असल्याचे भासवून विदर्भात बोगस बीटी कापसाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता

अकोला : तणनाशक तंत्रज्ञान असल्याचे भासवून विदर्भात बोगस बीटी कापसाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता असून, नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती देऊन बोगस बीटी बियाणे विक्री करणारे शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. यावर्षी अनिश्चित पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, त्यामुळे शेतकरी आतापासूनच द्विधा मन:स्थितीत आहे. तरीही शेतकऱ्यांचा ओढा कापूस पिकाकडे आहे. त्यामुळे कृषी विभागाला दक्ष राहण्याची गरज आहे.गतवर्षी विदर्भातील कापसाचे क्षेत्र सोयाबीनने घेतले असले, तरी या खरीप हंगामात कापसाचा पेरा होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे चांगल्या व भरघोस उत्पादनासाठी शेतकऱ्यांचा कल बीटी कापसाचे बियाणे खरेदी करण्यावर आहे; परंतु त्यांच्या माथी यावर्षीही बोगस बीटी कापसाचे वाण मारले जाण्याची शक्यता आहे. हे वाण शेतकऱ्यांना विकले जाण्याची शक्यता आहे. हे बियाणे अधिकृत नसून, ते विकण्याची परवानगी शासनाने दिलेली नाही. या बियाणांच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान, वाण तसेच कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केलेली आहे, याचा उल्लेख नाही, असे असताना या बीटीची विदर्भात दोन-चार वर्षांपासून सर्रास विक्री होत आहे. सूत्रांनी सांगितले की, गतवर्षी कृषी विभागाने काही विके्रत्यांवर थातुरमातुर कारवाई केली असली, तरी यावर्षी मात्र या बोगस बियाणावर आतापासूनच लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)४यावर्षी बोगस बियाणांची विक्री होऊ नये म्हणून आतापासूनच पाळत ठेवण्यास सुरुवात केली असून, बीटी कापसाच्या बियाणांची जेथे विक्री होत असेल, तेथे कृषी विभागाचा एक कर्मचारी राहणार आहे. बीटी बियाणाची संपूर्ण आकडेवारी ठेवली जाणार असून, अमरावती विभाग, जिल्हा, तालुका स्तरावर संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत, असे अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार यांनी सांगितले.