Join us

चेक व्यवहारांचे अलर्ट SMSद्वारे देणे बँकांना बंधनकारक- आरबीआय

By admin | Updated: November 7, 2014 17:44 IST

ग्राहकाने जमा केलेल्या प्रत्येक चेकच्या व्यवहाराचा एसएमएसद्वारे अलर्ट पाठवणे रिझर्व्ह बँकेने बंधनकारक केले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ -   ग्राहकाने जमा केलेल्या प्रत्येक चेकच्या व्यवहाराचा एसएमएसद्वारे अलर्ट पाठवणे रिझर्व्ह बँकेने बंधनकारक केले आहे. चेकसंदर्भातील घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी आरबीआयने ही उपाययोजना केली आहे. 
आरबीआयच्या निर्देशांनुसार, मोठ्या रकमेचा चेक जमा करण्यापूर्वी खातेधारकाला फोन करून अलर्ट करण्यात येईल व तो चेक क्लिअर झाल्यावरही खातेधारकाला आणखी एक मेसेज पाठवण्यात येईल. तसेच हा चेक ज्या माणसाने दिला असेल त्यालाही मेसेजद्वारे अलर्ट करण्यात येईल. या योजनेमुळे खातेदारांना माहीत होईल की त्याच्या नावाने काढण्यात आलेला चेक जमा झाला आहे की नाही. खातेधारकाने जर चेक दिला नसेल तर तो तसं बँकेला कळवू शकतो व चेक थांबवू शकतो. खातेधारकांना चेक व्यवहाराची माहिती वेळेवर मिळाली नाही तर घोटाळा होऊ शकतो, असे आरबीआयचे म्हणणे आहे. मात्र चेक हॅडलिंग व प्रोसेसिंगदरम्यान ग्राहकांना मेसेजद्वारे अलर्ट पाठवण्यात आला तर घोटाळा होण्याची शक्यता नसते, त्यामुळे सर्व बँकांनी ग्राहकांना मेसेज पाठवमे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी फक्त क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या व्यवहारांवरच मेसेजद्वारे अलर्टची सुविधा उपलब्ध होती, ज्यासाठी काही ठराविक चार्जही लावण्यात येत असे. 
तसेच रिझर्व बँकेने प्रत्येक चेकची तपासणी अनिवार्य केली आहे.  दोन लाख रुपयांहून अधिक रकमेचा चेक अल्ट्रा व्हॉयलेट लँपने स्कॅन करूनच जमा करण्यात यावा, असे निर्देशही आरबीआयने दिले आहेत. तर पाच लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या चेकची अनेक पातळीवर तपासणी होणार आहे.