Join us

एटीएम व्यवहार मर्यादित करण्यास बँका धजावेनात

By admin | Updated: November 3, 2014 03:10 IST

रिझर्व्ह बँकेने बँकांना महानगरात आपल्या एटीएम कार्डद्वारे मोफत व्यवहारांची मर्यादा पाचपर्यंत सीमित करण्यास परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने बँकांना महानगरात आपल्या एटीएम कार्डद्वारे मोफत व्यवहारांची मर्यादा पाचपर्यंत सीमित करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही बँकेने आपल्या एटीएम मशीनवर अशा प्रकारची मर्यादा लागू केली नाही. या मर्यादेनुसार, ग्राहकाचे खाते असलेल्या बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात पाच वेळा देव-घेवीचे व्यवहार केले जाऊ शकतात. भारतीय स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक व अ‍ॅक्सिस बँक यांनी अद्याप मोफत व्यवहाराची मर्यादा निश्चित करण्याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. एटीएम व्यवहार मर्यादाबद्ध केल्यास बँकांमध्ये मोठी गर्दी होऊन संपूर्ण यंत्रणाच कोलमडून पडेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मोफत एटीएम व्यवहार मर्यादाबद्ध करण्यास बँका धजावत नाहीत. मर्यादाबद्ध व्यवहारामुळे बँकांमध्ये मोठी गर्दी होईल. पैसे काढणे किंवा अन्य गैर वित्तीय उद्देशाने ग्राहकाच्या बँक शाखेत येण्यामुळे खर्चात वाढ होणार असून हा खर्च २० रुपयांहून अधिक असेल.एका खासगी बँकेतील अधिकारी म्हणाला, काही बँकांद्वारे ग्राहकांना अधिक मोफत देव-घेवीची सुविधा देण्याचा विचार सुरूआहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेच्या एका परिपत्रकानुसार, १ नोव्हेंबरपासून एका महिन्यात एटीएममधून पाचहून अधिक वेळा व्यवहार केल्यास प्रत्येकवेळी २० रुपये शुल्क आकारण्याचे अधिकार बँकेला असतील. मात्र, मोफत व्यवहाराची ही मर्यादा वाढविण्याबाबत बँकांना वैयक्तिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)