नवी दिल्ली : देशभरातील २० हजार १०६ टपाल कार्यालयांत कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने बचत खातेधारकांना या कार्यालयातून व्यवहार करता येईल, अशी माहिती दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ‘टिष्ट्वट’करून दिली आहे.२०१४ पर्यंत फक्त २३० टपाल कार्यालये कोर बँकिंग सुविधेने जोडण्यात आली होती. कोर बँकिंग सोल्यूशन (सीबीएस) टपाल विभागाच्या माहिती तंत्रज्ञान आधुनिकीकरण प्रकल्पाचा भाग आहे. विविध आयटी सोल्यूशनच्या माध्यमातून टपाल कार्यालये आयटी सुविधांनी सज्ज करणे, हा यामागचा उद्देश आहे. टपाल विभागाने सर्व विभागीय टपाल कार्यालयात सीबीएस प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात एटीएम आणि इंटरनेट बँकिंग सुविधेचाही समावेश असेल. टपाल विभागाला ७ डिसेंबर २०१५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने १८ महिन्यांत पेमेंट बँक स्थापन करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती.