Join us  

पुढच्या काही दिवसांत बंद होणार 'ही' बँक, वेळीच काढून घ्या तुमच्या ठेवी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 2:26 PM

आर्थिक आघाडीवर असलेल्या सुस्तीच्या वातावरणात एक बँक आपला गाशा गुंडाळणार आहे.

मुंबई - देशातील आर्थिक जगताला सध्या मंदीच्या वातावरणाने घेरले आहे. त्याचा परिणाम विविध उद्योगांवर दिसून येत आहे. दरम्यान, आर्थिक आघाडीवर असलेल्या सुस्तीच्या वातावरणात एक बँक आपला गाशा गुंडाळणार आहे. २०१८ मध्ये सुरू झालेली आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेड (ABIPBL) आपला कारभार आटोपता घेत आहे. कंपनीने आपला कारभार बंद करण्यासाठी स्वेच्छेने अर्ज दाखल केल्यानंतर ही बँक बंद करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे.

रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातील एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘’आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेडच्या बँक बंद करण्यासाठी स्वेच्छेन दाखल केलेल्या लिक्विडेशनच्या अर्जावर  मुंबई हायकोर्टाने १८ सप्टेंबर २०१९ रोजी शिक्कामोर्तब केले आहे. तसेच मुंबई हायकोर्टाने एलएलपीचे वरिष्ठ संचालक विजयकुमार व्ही. अय्यर यांना आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेडसाठी  लिक्विडेटर नियुक्त केले आहे, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या पत्रात म्हटले आहे.

यावर्षी जुलैमध्ये आदित्य बिर्ला यांनी आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेडचा कारभार आटोपता घेण्याची घोषणा केली होती. काही अनपेक्षित घटनांमुळे व्यवसाय करणे अव्यावहारिक बनले आहे, असे ही बँक बंद करण्याचे संकेत देताना आदित्य बिर्ला यांनी म्हटले होते.  

त्यानंतर आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक लिमिटेडने आपल्या www.adityabirla.bank या संकेतस्थळावरून एक संदेश प्रसारित करून बँकेचा कारभार आटोपता घेत असल्याची माहिती दिली होती. तसेच बँकेच्या ग्राहकांना आणि ठेविदारांना त्यांनी जमा केलेली रक्कम परत करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे बँकेकडून सांगण्यात आले आहे. पेमेंट बँकमध्ये जमा केलेली रक्कम  ऑनलाइन मोबाइल बँकिंग, बँकिंग पॉईंटच्या माध्यमातून परत घ्या, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.

यापूर्वी टेक महिंद्रा, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट तसेच आयडीएफसी बँक आणि टेलिनॉर फायनँशियल सर्व्हिसेसनेसुद्धा आपली पेमेंट बँक सर्व्हिस बंद केली होती. रिझर्व्ह बँकेने या सर्व कंपन्यांना २०१५ मध्ये पेमेंट बँकेसाठी परवाना दिला होता.  

  

टॅग्स :बँकिंग क्षेत्रबँकअर्थव्यवस्था