Join us
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचा-यांना दिवाळी भेट न घेण्याची ताकीद

By admin | Updated: October 21, 2014 04:59 IST

यंदा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या कर्मचा-यांना ग्राहकांकडून दिवाळीनिमित्त भेटवस्तू न स्वीकारण्याची सक्त ताकीद

डिप्पी वांकाणी, मुंबईयंदा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी त्यांच्या कर्मचा-यांना ग्राहकांकडून दिवाळीनिमित्त भेटवस्तू न स्वीकारण्याची सक्त ताकीद दिली असून, तशी भेट घेताना कोणी आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदा ऐन दिवाळीच्या तोंडावर बँकांमध्ये ग्राहकांनी भेटवस्तू आणू नयेत, असे फलक लावले आहेत. मात्र काही कंपन्यांमध्ये ही देवघेव वेगळ्या प्रकारे सुरू आहे. काही कर्मचाऱ्यांनी भेटी आपल्या घरी पोहोचत्या करण्याच्या सूचना दिल्या आहेत; तर काहींनी कार्यालयाजवळील एखाद्या दुकानात किंवा अन्य ठिकाणी त्या ठेवण्याची आणि नंतर घेण्याची सोय केली आहे. एका अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीत कामाला असलेल्या ए. शहा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की यंदा त्यांच्या कंपनीने बँकेत सतत संपर्कात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना क्रोकरी भेट देण्याचे ठरवले होते; पण बँकांनी भेटी न घेण्याचे सरळ फलकच लावल्याने नाइलाज झाला आहे. पूर्वी काही जण घरी भेट पोहोचवण्यास सांगायचे; पण आता त्यांनी भेटवस्तूंबद्दल बोलण्याचेही टाळले आहे. काही खासगी कंपन्यांनीही हेच धोरण अवलंबले आहे; पण काही कर्मचारी कार्यालयाजवळील दुकानात किंवा अन्य ठिकाणी वस्तू ठेवण्यास सांगत आहेत. तेथून नंतर ते त्या गोळा करतात. कॉर्पोरेटस्नी मात्र ज्यांना भेटवस्तू घ्यायच्या नसतील त्यांना विनाकारण गळ घालू नका, अशा सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या.