Join us  

धक्कादायक! बँक ऑफ बडोदाच्या 900 शाखा होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 2:44 PM

सार्वजनिक क्षेत्रात मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदानं 900 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्लीः सार्वजनिक क्षेत्रात मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदानं 900 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देना बँक आणि विजया बँक विलीन झाल्यानंतर आता बँक ऑफ बडोदाच्या या शाखा बंद होणार आहेत. या तिन्ही बँकांचं 1 एप्रिल रोजी विलीनीकरण झालं आहे. बँक ऑफ बडोदाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, एकाच ठिकाणी देना बँक आणि विजया बँकेच्या शाखा असताना तिथेच बँक ऑफ बडोदाची शाखा असणं गरजेचं नाही. तसेच एकाच इमारतीत या तिन्ही बँकांच्या शाखा असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे या शाखा एक तर बंद होतील किंवा त्यांचं विलीनीकरण करण्यात येईल. जेणेकरून संचालन क्षमता प्रभावित होऊ नये.बँक ऑफ बडोदा अशा प्रकारे 900 शाखांचं संचालन बंद करणार आहे. दक्षिण, पश्चिम आणि उत्तर भागात विस्तार केल्यानंतर आता बँकेची नजर पूर्व क्षेत्रातील शाखांवर आहे. या बँकांच्या विलीनीकरणानंतर बँक ऑफ बडोदाच्या 9500 शाखा आणि 85 हजार कर्मचारी झाले आहेत. अशा प्रकारे एसबीआय आणि पीएनबीनंतर देशातली तिसरी सर्वात मोठी बँक म्हणून बँक ऑफ बडोदा समोर आली आहे. याची एकूण बाजारातील उलाढाल 15 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. बँक ऑफ बडोदाजवळ सध्या ग्राहकांची संख्या 12 कोटींच्या घरात आहे. बुडीत खात्यात गेलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बँकांना नवसंजीवनी देण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. सध्या तिन्ही बँकांना नुकसानाला सामोरं जावं लागतं आहे.

विलीनीकरणानंतर या बँकांना त्यांच्याकडे असणारी संपत्ती सहज विकता येईल आणि त्यातून त्यांचं नुकसान भरून काढता येईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकिंगच्या नियमांमध्येही लवकरच मोठे बदल होणार आहेत. मोठ्या तोट्यात असणाऱ्या बँकांना या नियमांचा फटका बसणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं बँकांचा तोटा कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बँकांचं विलीनीकरण हा त्याच प्रयत्नांचा भाग समजला जात आहे. 

टॅग्स :बँक