Join us  

Bajaj Auto Q4 Results : मार्च तिमाहीत २०११ कोटींचा नफा, कंपनी देणार तगडा डिविडंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 12:44 PM

बजाज ऑटो लिमिटेडने 18 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

Bajaj Auto Q4 Results : बजाज ऑटो लिमिटेडने 18 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. कंपनीनं जानेवारी-मार्च तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 18 टक्क्यांनी वाढून 2011.43 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 1705 कोटी रुपयांचा नफा झाला होता. याव्यतिरिक्त, बजाज ऑटोनं 31 मार्च रोजी संपलेल्या तीन महिन्यांत 11554.95 कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील 8,929 कोटी रुपयांच्या महसुलापेक्षा हे सुमारे 30 टक्क्यांनी अधिक आहे. 

याशिवाय मार्च तिमाहीत कंपनीचा EBITDA 34.4 टक्क्यांनी वाढून 2307 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीत 1717 कोटी रुपये होता. कंपनीचे EBITDA मार्जिन वार्षिक आधारावर 19.3 टक्क्यांवरून 20.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 

डिविडेंडची घोषणा 

बजाज ऑटोनं आपल्या शेअरधारकांसाठी डिविडेंडही जाहीर केलाय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 80 रुपये डिविडंड देणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी इक्विटी शेअर्सवरील 10 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर 80 रुपये प्रति शेअर (800%) दराने डिविडंड मंजूर केला असल्याची माहिती त्यांनी एक्सचेंज फायलिंगमध्ये दिली. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेण आवश्यक आहे.)

टॅग्स :बजाज ऑटोमोबाइलव्यवसाय